इंधन खरेदीसाठी आलेली वाहने भस्मसात : तेल शुद्धीकरण कारखाना बेकायदेशीर
अबुजा / वृत्तसंस्था
आग्नेय नायजेरियातील बेकायदेशीर तेल शुद्धीकरण कारखान्यात (रिफायनरी) स्फोट होऊन 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. स्फोटामुळे आग सर्वत्र पसरल्याने दुर्घटनेची तीव्रता अधिकच वाढली. या दुर्घटनेवेळी इंधन खरेदीसाठी रांगेत उभी असलेली अनेक वाहने भस्मसात झाली आहेत. वाहनांची संख्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आली नसली तरी या दुर्घटनेमध्ये लाखोंचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे.
नागजेरियातील इगबेमा येथील एका बेकायदेशीर तेलशुद्धीकरण कारखान्यात स्फोटाची दुर्घटना घडली आहे. या स्फोटानंतर आगीचा प्रचंड भडका उडाला. त्यानंतर आग वेगाने अन्य दोन बेकायदेशीर इंधन कारखान्यांमध्येही पसरली. आगीच्या भडक्यामुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट वाहताना दिसत होते. या दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. स्फोटाचे कारण शोधले जात आहे. आग एका बेकायदेशीर बंकरिंगच्या ठिकाणी लागली. यामध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या लोकांची ओळख पटू शकली नाही, असे राज्य पेट्रोलियम संसाधन आयुक्त गुडलक ओपिया यांनी सांगितले.
बेकायदेशीर कारखान्यांमध्ये यापूर्वीही दुर्घटना
तेल उत्पादक नायजेरियामध्ये बेरोजगारी आणि गरिबीमुळे बेकायदेशीर तेल शुद्धीकरण कारखान्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. प्रमुख तेल कंपन्यांच्या मालकीच्या पाईपलाईनमधून कच्चे तेल टॅप केले जाते. नंतर उत्पादन तात्पुरत्या टाक्मयांमध्ये काढून घेतले जाते. अशा धोकादायक प्रक्रियेमुळे अनेक जीवघेणे अपघात यापूर्वीही येथे झालेले आहेत. गेल्यावषी ऑक्टोबरमध्ये बेकायदा रिफायनरीमध्ये स्फोट होऊन काही मुलांसह किमान 25 जणांचा मृत्यू झाला होता.