100 जण जखमी ः बांगलादेशात पुन्हा मोठी दुर्घटना
@ वृत्तसंस्था / ढाका
बांगलादेशची राजधानी ढाका येथील गुलिस्तान भागात मंगळवारी संध्याकाळी एका इमारतीत झालेल्या विस्फोटात 14 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या 11 युनिट्स घटनास्थळी बचावकार्यात सामील झाल्याची माहिती अग्निशमन सेवा अधिकारी रशीद बिन खालिद यांनी दिली आहे.
या विस्फोटामुळे 7 मजली इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर परिसरातील अन्य इमारतींचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तर विस्फोटामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सिद्दीकी बाजारपेठेतील एका व्यावसायिक इमारतीत हा विस्फोट झाला असून यात अनेक कार्यालये तसेच दुकाने होती. 7 मजली इमारतीतील दोन मजले पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. विस्फोटानंतर इमारतीतील सामग्रीचे अवशेष रस्त्यांवर फैलावले आहेत. तर विस्फोटाच्या तावडीत रस्त्यावर उभी असलेली एक बसही सापडली आहे.
ढाक्यामध्ये मंगळवारी झालेला हा विस्फोट मागील 7 दिवसांमधील तिसरा विस्फोट आहे. यापूर्वी 5 मार्च रोजी एका प्रयोगशाळेत विस्फोट झाला होता, यात 3 जणांना जीव गमवावा लागला होता. तर 40 जण जखमी झाले होते. एअर कंडिनशरमधील बिघाडामुळे हा विस्फोट झाल्याचे सांगण्यात आले होते. तर सोमवारी ढाका येथील ऑक्सिजन प्रकल्पात स्फोट होत 5 जणांचा मृत्यू झाला होता.