12 वर्षीय मुलाचा मृत्यू ः निप्रॉपेट्रोस ओब्लास्ट येथील घटना
रशिया-युक्रेन युद्धात आता प्रतिबंधित शस्त्रास्त्रांचा वापर झाल्याचा दावा करण्यात येत आहे. रशियाने प्रतिबंधित क्लस्टर बॉम्बचा वापर केल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. या क्लस्टर बॉम्बमुळे एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. युक्रेनच्या निप्रॉपेट्रोस ओब्लास्टमध्ये ही घटना घडली आहे.
निप्रॉपेट्रोस ओब्लास्टचे गव्हर्नर व्हॅलेंटाइन रेज्निचेंको यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. रशियाच्या सैन्याने सिनेलनिकोव्ह जिल्हय़ात क्लस्टर बॉम्बने हल्ला केला होता. हल्ल्यानंतर काही बॉम्बचा स्फोट न होताच पडले होते. यातील एक बॉम्ब 12 वर्षीय मुलाने उचलून स्वतःच्या घरी नेला होता. मुलाच्या घरी या बॉम्बचा स्फोट झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
क्लस्टर बॉम्बचा वापर करून रशिया विश्वासघात करत असल्याचे गव्हर्नर रेज्निचेंको यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय करारानुसार युद्धादरम्यान क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यावर बंदी आहे. परंतु आतापर्यंत रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी या करारावर स्वाक्षरी केलेली नाही.
क्लस्टर बॉम्बला अत्यंत धोकादायक मानले जाते. मुख्य बॉम्बमधून अनेक छोटे बॉम्ब बाहेर पडत असतात. निर्धारित लक्ष्याच्या आसपासच या बॉम्बकडून नुकसान पोहोचविले जाते. या बॉम्बमुळे सर्वसामान्य लोकांना नुकसान पोहोचण्याचा धोका अधिक असतो. मुख्य बॉम्बचा स्फोट झाल्यावर त्यातून पडणारे छोटे बॉम्ब आसपास पडतात आणि दीर्घकाळ स्फोट न होताच जमिनीवर पडून राहतात. युद्ध संपल्यावर किंवा शांतता निर्माण झाल्यावर या बॉम्बच्या संपर्कात कुणी आल्यास त्यामध्ये स्फोट घडू शकतो.