ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीर एक बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. जम्मूमधील प्रताप सिंग पुरा ललियाना गावातील शेतात हा स्फोट झाल्याची महिती समोर आली आहे. या बॉम्ब स्फोटांनंतर कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. (Blast on Jammu outskirts ahead of PM Modis visit)
पाकिस्तानातून घुसखोरी करून आलेले जैश-ए-मोहम्मदचे दोन आत्मघातकी बाँबर व सुरक्षादले यांच्यात जोरदार चकमक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांबा जिल्ह्यातील पल्ली पंचायतीच्या भेटीच्या आदल्या दिवशी जम्मू व काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी आज जम्मू-काश्मीरमधील पल्ली, सांबा (Samba) येथे पंचायत परिषदेला संबोधित करणार आहेत. हा स्फोट शेताच्या मधोमध झाला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीच्या ठिकाणापासून केवळं आठ किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाला आहे. स्फोटाचा आवाज ऐकून पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिश्नाहच्या प्रताप सिंह पुरा ललियाना गावात रविवारी पहाटे ४.२५ च्या सुमारास मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला. स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घराबाहेर पडले आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. संशयित स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की शेजारी राहणाऱ्या लोकांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट शेताच्या मध्यभागी झाला. या स्फोटानंतर जमिनीत खोल खड्डा तयार झाला आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून हा संशयास्पद स्फोट कसा झाला, याचा तपास केला जात आहे.