Tarun Bharat

पंजाब पोलिसांच्या गुप्तचर कार्यालयावर हल्ला

खलिस्तानवाद्यांचे कृत्य असल्याचा संशय, कठोर कारवाईचे आश्वासन

चंदीगढ / वृत्तसंस्था

Advertisements

पंजाब पोलिसांच्या मोहाली येथे असणाऱया गुप्तचर कक्षाच्या कार्यालयावर क्षेपणास्त्रसदृश साधनाने हल्ला करण्यात आला आहे. ही गंभीर आणि चिंताजनक घटना मंगळवारी सकाळी घडली. दुरुन डागण्यात आलेल्या या स्फोटकाचा स्फोट न झाल्याने मोठी हानी टळली असली तरी हल्ल्याचा हा प्रकार अतिशय चिंताजनक आहे, अशी प्रतिक्रिया अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे. हा हल्ला सोमवारी रात्री 8 नंतर करण्यात आला. मात्र त्यावेळी हे कार्यलय बंद असल्याने हल्ल्याची  घटना  मंगळवारी पहाटे लक्षात आले, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या घटनेमुळे पंजाबात पुन्हा दहशदवाद्यांनी डोके वर काढले आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रकार घडवून आणणाऱया गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात येईल, असे आश्वासन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी दिले. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.

दोनजण ताब्यात 

हा हल्ला कसा करण्यात आला याचा शोध घेण्यात येत आहे. हे स्फोटक गुप्तचर कक्षावर येऊन आदळले तेव्हा तेथे कोणीही नव्हते. या प्रकरणी हरियाणातील अंबाला येथून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात  आले आहे. त्याच्याकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा हल्ला हा गुप्तचर कक्ष उडवून नष्ट करण्यासाठीच करण्यात आला होता, असे स्पष्ट करण्यात आले

भिंतीवर आदळले

हे स्फोटक कक्षाच्या खिडकीतून आत पाठवून स्फोट घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, नेम चुकल्याने स्फोटक खिडकीतून आत न जाता कक्षाच्या भिंतीवर आदळले. त्यामुळे भिंतीची हानी झाली. म्हणाव्या तशा तीव्रतेने हा स्फोट न झाल्याने त्यात कोणीही जखमी झाले नाही. तथापि, असे प्रकार पुन्हा घडल्यास ती अधिकच गंभीर बाब होईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट पेले गेले

पोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे

या स्फोटाच्या प्राथमिक तपासातच पोलिसांना मोठे धागेदोरे हाती लागले आहेत. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा रहस्यभेद केला जाईल. हे स्फोटक ज्या स्वीफ्ट कारवरुन डागण्यात आले, त्या कारचा पत्ता लागला आहे. या हल्ल्याचे सूत्रधार विदेशातील आहेत. त्यांनी भारतातील समाजकंटकांना हाताशी धरून ही घटना घडविली, असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. ही स्वीफ्ट कार स्फोटके फेकल्यानंतर त्वरित हरियाणाकडे जात होती असे स्पष्ट करण्यात आले.

कारचा पाठलाग

घटना लक्षात येताच जवळ उपस्थित पोलिसांनी आपल्या वाहनांमधून या स्वीफ्ट कारचा पाठलाग सुरु केला. हरियाणाचे अंबाला कनेक्शन त्यातूनच लक्षात आले. त्यामुळे नंतर अंबाला येथे जाऊन दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा हल्ला कक्षापासून 80 मीटर दूरवरुन करण्यात आला आहे. अज्ञात हल्लेखोरांवर प्रकरण गुदरण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.

आरपीजी 22 चा उपयोग

हल्लेखोरांनी आरपीजी 22 (रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड) या स्फोटकाचा उपयोग हल्ला करण्यासाठी केला, असे निष्पन्न झाले आहे. या स्फोटकाची क्षमता 40 सेंटीमीटर जाडीची सिमेंट काँक्रिटची भिंत भेदण्याची आहे. हे घातक स्फोटक मानले जाते. असे स्फोटक हल्लेखोरांजवळ कोठून आले याचाही शोध घेतला जात आहे. हे टीएनटी प्रकारचे स्फोटक होते, अशी माहिती या प्रकरणी पोलिसांनी दिली आहे.

एनआयएचीही धाव

हल्ल्यानंतर त्वरित राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) कामाला लागली आहे. या संस्थेचे एक दल घटनास्थळी धाडण्यात आले. सकाळी 11 वाजल्यापासून या दलाने आपली कारवाई सुरु केली आहे. हे दहशतवादीं कृत्य असल्याचा संशय असल्याने एनआयएची भूमिका महत्वाची ठरणार आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडेही द्यावा अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे.

स्फोटक हल्ल्याने खळबळ…

ड स्फोटक हल्ल्यामुळे खलिस्तानकाळातल्या आठवणी झाल्या ताज्या

ड या हल्ल्याचे सूत्रसंचालन विदेशातून झाले असण्याची दाट शक्यता

ड पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाने घेतली गंभीर दखल

ड गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याचे मुख्यमंत्री मान यांचे आश्वासन

Related Stories

इस्रोचा ‘व्योममित्र’ अंतराळाचे अंतरंग उलगडणार

Patil_p

भारताकडे सुरक्षा परिषदेचे अध्यक्षत्व

Patil_p

केबल चोरीप्रकरणी हवालदार अटकेत

Patil_p

आसाममधील नगौरमध्ये भूकंपाचे धक्के

Rohan_P

‘मन की बात’मध्ये निर्यातीतील विक्रमाचे कौतुक

Patil_p

नव्या शिक्षण धोरणात बुद्धिमत्तेवर अधिक भर!

Patil_p
error: Content is protected !!