‘डिजियात्रा’ सुविधेचा नागरी उड्डाणमंत्री सिंधियांच्या हस्ते शुभारंभ


वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुरुवारी ‘डिजियात्रा’ सुविधेचा शुभारंभ केला आहे. याच्या अंतर्गत राष्ट्रीय राजधानीतील विमानतळावर फेशियल रिकग्निशन सिस्टीमच्या आधारावर प्रवाशांना प्रवेशाची अनुमती असणार आहे. डिजियात्रा सुविधेसह विमानतळांवर प्रवाशांना पेपरलेस प्रवेश मिळणार आहे. सुरक्षा तपासणी क्षेत्रांसह विविध तपासणी नाक्यांवर फेशियल रिकग्निशन सिस्टीमच्या आधारावर प्रवाशाचा डाटा स्वयंचलित स्वरुपात अपडेट केला जाणार आहे. दिल्लीसह वाराणसी अन् बेंगळूर विमानतळावर डिजियात्रा सुविधा गुरुवारी सुरू करण्यात आली आहे.
डिजियात्रा सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना आधार प्रमाणन आणि एक सेल्फ इमेज कॅप्चरचा वापर करून डिजियात्रा ऍपवर स्वतःचा तपशील नोंद करावा लागणार आहे. याच्या पुढील टप्प्यात बोर्डिंग पास स्कॅन करावा लागतो आणि स्वतःची पार्श्वभूमी विमानतळाला पुरवावी लागते.
विमानतळाच्या ई-गेटवर प्रवाशाला प्रथम कोडेड बोर्डिंग पास स्कॅन करावा लागणार आहे. त्यानंतर ई-गेटवर बसविण्यात आलेली फेशियल रिकग्निशन सिटीम प्रवाशाची ओळख अन् प्रवास दस्तऐवज मान्य करणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रवासी ई-गेटमधून विमानतळात प्रवेश करू शकतो. प्रवाशाला सुरक्षा मंजुरी आणि विमानात जाण्यासाठी सामान्य प्रक्रियेचे पालन करावे लागणार आहे.
डिजियात्रा फेशियल रिकग्निशय तंत्रज्ञानावर आधारित असून यामुळे बोर्डिंग प्रकिया वेगवान होणार आहे. याचबरोबर डिजियात्रा विमानतळावरील सुरक्षा सुनिश्चित करणार आहे. प्रवासी डाटा एअरलाइन्स डिपार्चर कंट्रोल सिस्टीमसोबत अटॅच असणार आहे, यामुळे केवळ संबंधित प्रवासीच टर्मिनलमध्ये प्रवेश करू शकणार आहे. डिजियात्राच्या संचालनासाठी डिजियात्रा फौंडेशनला नोडल संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे. ही एक स्वयंसेवी कंपनी आहे. फौडेंशनचे समभागधारक एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, कोची इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, बेंगळूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आहेत.