वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीमा सुरक्षा दलाचे सैनिक राकेशकुमार यांनी एक आदर्श उदाहरण सर्वांसाठीच घालून दिले आहे. या 52 वषीय सैनिकाने मृत्यूनंतर देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार देहदान केले गेल्याने तीन रुग्णांचे प्राण वाचले आहेत. राकेशकुमार यांची मूत्रपिंडे एका रुग्णाला देण्यात आली असून त्यांचे हृदय एका हृदयविकारग्रस्त रुग्णामध्ये प्रत्यारोपण करण्यात आले आहे.
राकेशकुमार हे फिरोजाबाद येथील रहिवासी असून 3 ऑक्टोबरला ते त्यांच्या घरी इलेक्ट्रिक फिटिंग करत असताना शॉक लागून कोसळले होते. त्यांना अधिक उपचारांसाठी एम्समध्ये आणण्यात आले होते. त्यांना 6 ऑक्टोबरला ब्रेनडेड घोषित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे अवयवदान करण्यात आले.
एप्रिल 2022 पासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील ट्रॉमा केंद्रात 13 देहदाने झालेली आहेत. 1994 नंतर एका वर्षात इतकी देहदाने झाल्याची ही पहिलीच घटना आहे. ब्रेनडेथ प्रमाणपत्र आणि देहदान करण्याची प्रक्रिया नव्याने निर्धारित करण्यात आल्यामुळे ब्रेनडेड व्यक्ती सहजगत्या देहदान करू शकते.