ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
होनगा (ता. बेळगाव) येथील शेतवडीतील विहिरीत एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. काकती पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
भैरू कल्लाप्पा काकतकर यांच्या विहिरीत एक मृतदेह तरंगताना आढळून आला. प्रत्यक्षात रविवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. विहिरीतून दुर्गंधी पसरल्याने शेतमालकाने विहिरीत डोकावून पाहिले असता मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला.
सोमवारी सकाळी काकतीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. उत्तरीय तपासणीसाठी तो शवागारात पाठविण्यात आला आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून मृत युवकाच्या हातावर ‘एसके’ असे गोंदलेले आहे. संबंधितांनी काकती पोलीस स्थानकाशी 9480804115 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.