प्रतिनिधी /वाळपई
अंजुणे धरणामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह सापडण्याची घटना घडली. सदर मृतदेहाची ओळख अजून पर्यंत पटलेली नाही. त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस स्थानकातही व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद नसल्यामुळे सदर व्यक्ती इतर भागातील असण्याची शक्मयता आहे. सदर इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने या व्यक्तीने आत्महत्या की अपघात याबाबत मात्र अजून पर्यंत स्पष्टता झालेली नाही.
याबाबतची माहिती अशी की अंजुणे धरणात मृतदेह तरंगत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाल्यानंतर घटनेची माहिती वाळपई अग्निशामक दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाचा जवान सत्यवान गावस यांनी तातडीने सदर ठिकाणी धाव घेऊन तरंगत असलेल्या मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा केला.
सदर मृतदेह हा अंदाजे 50 वषीय इसमाचा असण्याची शक्मयता आहे. तसेच त्याचा एक पाय कृत्रिम असून त्याच्या अंगावर शर्ट व फुल पॅन्ट आहे. वाळपई पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तररीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठवून दिला आहे.
सदर मयत इसमाची ओळख अजून पर्यंत पटलेली नाही. तसेच वाळपई किंवा डिचोली भागामध्ये एका पायाने अपहत असलेला इसम बेपत्ता होण्याचे माहिती नोंद झालेली नाही. यामुळे सदर इसम अन्य भागातील असण्याची शक्मयता पोलिसांनी वर्तविलेली आहे.
दरम्यान अंजुणे धरणाच्या भोवती व्यवस्थित संरक्षण कुंपण नसल्यामुळे या इसमाने सदर धरणाकडे जाण्याचा प्रयत्न केला. धरणाच्या किनारी त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यामुळे धरणाच्या भोवती संरक्षण कुंपणाचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. दरम्यान या धरणामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्यामुळे केरी भागामध्ये काही प्रमाणात भीतीची छाया पसरलेली आहे. याबाबत वाळपई पोलीस अधिक तपास करीत आहेत.