282 जागांसाठी 3721 अर्ज, उमेदवारांचे प्रक्रियेकडे लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या रिक्त जागांसाठी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र पुढील प्रक्रियेअभावी भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे सेविका आणि मदतनीस उमेदवारांतून नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हय़ात 28 सेविका जागांसाठी 1028 अर्ज दाखल झाले आहेत. तर मदतनीसांच्या 254 जागांसाठी 2693 अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊन महिना उलटला तरी अद्याप पुढील कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सेविका आणि मदतनीसांचे लक्ष भरती प्रक्रियेकडे लागले आहे.
जिल्हय़ात 5331 अंगणवाडी केंदे आहेत. त्यामध्ये नवीन अंगणवाडी केंद्रांची भर पडली आहे. या केंद्रांमध्ये सेविका आणि मदतनीसांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज संबंधित उमेदवारांकडून दाखल झाले आहेत. त्यामुळे भरती प्रक्रियेकडे भावी अंगणवाडी शिक्षिकांचे लक्ष लागून आहे.
या भरती प्रक्रियेत विधवा आणि ऍसिड हल्ला झालेल्या महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. दरम्यान संबंधित महिलांनी अर्ज न केल्यास इतर महिलांचा विचार केला जाणार आहे. शेतकरी विधवा महिला, सामान्य विधवा महिला आणि 60 टक्क्मयांहून अधिक दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. संबंधित महिला नसल्यास सामान्य महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे.
जिल्हय़ातील रिक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या जागा भरण्यासाठी मंजुरी मिळाली होती. दरम्यान 3721 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे चुरस निर्माण झाली होती. मात्र शासनाकडून काही कारणास्तव भरती प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांवर कामाचा ताण वाढला आहे. जिल्हय़ातील रिक्त जागांवर तातडीने नेमणूक होणार आहे, असे वाटत होते. मात्र भरती प्रक्रिया रखडल्याने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अलीकडे शासनाने अंगणवाडय़ा स्मार्ट करून विविध सुविधा पुरविल्या आहेत. त्याचबरोबर अंगणवाडय़ांचा कायापालट झाला असून कारभारदेखील ऑनलाईन झाला आहे. मात्र अद्याप काही अंगणवाडय़ांमध्ये रिक्त जागा भरण्यात आल्या नाहीत. सध्या कार्यरत असलेल्या सेविका आणि मदतनीसांवरच कारभार सुरू आहे. त्यामुळे बालविद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. त्यामुळे भावीसेविका आणि मदतनीसांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र भरती प्रक्रिया रखडल्याने पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.
प्रतिक्रिया
बसवराजू ए. एम. (सहसंचालक महिला व बालकल्याण खाते)
लवकरच रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. काही कारणास्तव प्रक्रिया थांबली आहे. शासनाकडून नवीन नियमावली जारी झाली आहे. नवीन नियमानुसार भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी 3000 हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.