हल्ल्यात इमारतीचे नुकसान
वृत्तसंस्था/ कन्नूर
केरळच्या कन्नूर जिल्हय़ातील पय्यानुरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात आला आहे. पय्यानुर पोलिसांनुसार ही घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. बॉम्बहल्ल्यात इमारतीच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. पय्यानुरमध्ये संघ कार्यालयावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2017 मध्ये संघ कार्यालयात तोडफोड तसेच जाळपोळीचा प्रकार घडला होता. माकप कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप होता.
मंगळवारी झालेल्या बॉम्ब हल्ल्यात कुणी जखमी झाल्याची माहिती नाही. अशाप्रकारचे हल्ले रोखण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. केरळमधील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सामाजिक संघटनांवर बॉम्ब फेकण्याच्या पातळीपर्यंत बिघडली आहे. सभ्य समाजात हा प्रकार अस्वीकारार्ह आहे. यापूर्वीही सामाजिक कार्यांमध्ये सामील संघ स्वयंसेवकांवर हल्ले झाले आहेत. केरळचे लोक अशाप्रकारच्या घटना सहन करणार नसल्याचे उद्गार भाजप नेते टॉम वडक्कन यांनी काढले आहेत.
समाजकंटकांशी पोलिसांचे संगनमत धोकादायक आहे. पोलीस स्थानकापासून केवळ 100 मीटरवर संघ कार्यालय असूनही बॉम्ब फेकण्याची घटना घडते. कन्नूरसारख्या संवेदनशील जिल्हय़ात सत्तारुढ माकपच्या विचारसरणीच्या विरोधातील संघटनांच्या कार्यालयांना विशेष स्वरुपात सुरक्षा मिळायला हवी असे वडक्कन म्हणाले.
यापूर्वी 24 जून रोजी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वायनाड येथील कार्यालयात तोडफोड करण्यात आली होती. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. माकपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सुचनेनुसार हा हल्ला करण्यात आला. एफएसआयचे कार्यकर्ते तोडफोड करत असताना पोलीस अधिकारी तेथे बघ्याच्या भूमिकेत होते असा आरोप काँग्रेसने केला आहे. राहुल गांधी हे केरळच्या वायनाडचे खासदार आहेत.