कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिह्यातील भूपतीनगर भागात तृणमूल काँग्रेसचे नेते राजकुमार मन्ना यांच्या घरात बॉम्बस्फोट होण्याची घटना नुकतीच घडली. शुक्रवारी रात्री झालेल्या या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा बॉम्बस्फोट एवढा भीषण होता की घराचे छत आणि भिंती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या घटनेत मृत झालेल्यांची नावे स्पष्ट करण्यात आली नसली तरी ते तृणमूलचेच कार्यकर्ते असल्याचे समजते. हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. घरावर कोणीतरी बॉम्ब टाकला की घरात असलेल्या बॉम्बचा स्फोट झाला याचा तपास पोलीस करत आहेत. घरातच ठेवलेल्या प्रुड बॉम्बचा स्फोट झाल्याने ही घटना घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी या स्फोटासाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. अशा स्फोटांच्या घटनांमध्ये नेहमीच तृणमूलचे नेते सामील असतात असे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, घरी क्रूड बॉम्ब बनवत असताना हा स्फोट झाल्याचा दावा बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मजुमदार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.