विजय दिनी पुतीन करू शकतात आक्रमणाची घोषणा
युरोपमधील अत्यंत छोटा देश असलेल्या मोल्दोवामधील स्फोटांनंतर रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे पुढील लक्ष्य हा देश ठरू शकतो अशी भीती व्यक्त होतेय. मोल्दोवाच्या ट्रान्सनिस्ट्रिया क्षेत्रात स्फोटांनंतर युक्रेनच्या शेजारी देशात युद्धाच्या जोखिमीबद्दल विचारण्यात आले असता रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी ‘मोल्दोवाने स्वतःच्या भविष्याबद्दल चिंता करावी, कारण त्याला नाटोमध्ये खेचण्यात येतेय’ असे म्हटले आहे.
ट्रान्सनिस्ट्रिया हा मोल्दोवातीलच एक भूभाग आहे. येथे युक्रेनियन्स आणि रशियन वंशाच्या नागरिकांची संख्या मोल्दोवन वंशीयांपेक्षा अधिक आहे. 25 आणि 26 एप्रिल रोजी ट्रान्सनिस्ट्रियामध्ये स्फोट झाल्यावर रशियाच्या हल्ल्याची शंका वाढली आहे. पुतीन हे युक्रेनच्या हल्ल्याच्या तीव्रतेची घोषणा करण्यासाठी रशियाच्या विजय दिनाचा वापर करू शकतात आणि बहुधा नव्या ठिकाणी युद्ध पुकारू शकतात अशी भविष्यवाणी ब्रिटनचे संरक्षण सचिव बेन वालेस यांनी केली आहे.
पुतीन यांच्याकडून घोषणा शक्य
रशियाच्या राष्ट्रपतींना युक्रेन युद्धात फारसे यश मिळालेले नाही हे उघड झाले आहे. 9 मे रोजीच्या विजय दिन संचलनात पुतीन कथित नाझींच्या विरोधात युद्धाची घोषणा करू शकतात. 9 मे रोजी कुठल्याही प्रकारच्या विजयाची घोषणा करता येईल अशा स्थितीत राहण्याचा प्रयत्न पुतीन यांचा असल्याचा दावा यापूर्वी विश्लेषकांनी केला होता. परंतु युद्धभूमीत फारसे यश न मिळाल्याने रशियाचे सैन्य आता अन्य ठिकाणी युद्ध सुरू करण्याची भीती व्यक्त होत आहे.