वृत्तसंस्था /पॅरिस
भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा डच साथीदार मॅटवे मिडेलकूप यांनी प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला तर रामकुमार रामनाथन व त्याचा अमेरिकन साथीदार हंटर रीस यांनी दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.
बोपण्णा व मिडेलकूप यांनी दुसऱया फेरीच्या लढतीत आंद्रे गोलुबेव्ह व फॅब्रिस मार्टिन यांचा 6-3, 6-4 असा पराभव केला. बोपण्णा व मिडेलकूप यांना येथे 16 वे मानांकन देण्यात आले आहे. दुसऱया सेटमध्ये 4-4 वर असताना त्यांनी कझाक-प्रेंच जोडीची सर्व्हिस भेदली आणि नंतर मिडेलकूपने आपल्या सर्व्हिसवर सामना संपवला. बोपण्णाने आजवर या स्पर्धेत 2011, 2016, 2018, 2021 यावर्षी शेवटच्या आठ टप्प्यापर्यंत मजल मारली आहे. बोपण्णा-मिडेलकूप जोडीने पहिल्या फेरीत फ्रान्सच्या साशा ग्वेमार्ड वायेनबर्ग व लुका व्हान ऍशे यांना 6-4, 6-1 असे हरविले होते.
रामकुमारने रीसच्या साथीने ग्रँडस्लॅमच्या मुख्य ड्रॉमध्ये पहिला विजय मिळविला. त्यांनी जर्मनीच्या डॅनियल अल्टमायर व ऑस्कर ओट यांच्यावर 7-6 (7-4), 6-3 अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. रामकुमारने एकेरीत अनेकदा मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळविला असला तरी त्याला पहिल्या फेरीत एकदाही विजय मिळविता आला नव्हता. दुहेरीत त्याने आता टॉप शंभरमध्ये स्थान मिळविले असून ग्रँडस्लॅममध्ये पहिला विजय मिळविण्यात त्याला यावेळी यश आले.