प्रतिनिधी /फोंडा
बोरी येथील प्रतिभा प्रेन्ड्स सर्कल या संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेला यंदा 60 वर्षे पूर्ण होत असून शनिवार 23 रोजी हिरक महोत्सवी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कला व संस्कृती संचालनालयाच्या सहकार्याने बोरी येथील श्री नवदुर्गा मंदिरच्या सभागृहात सायं. 5.30 वा. हा कार्यक्रम होणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष जयंत मिरींगकर यांनी फोंडा येथे पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. उपाध्यक्ष विश्वंभर देवारी, विनोद पोकळे, संजय भट बोरकर व विश्रांती पैदरकर हे उपस्थित होते. हिरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पुण्यातील प्रसिद्ध गायक कलाकार पं. विजय कोपरकर यांचा सत्कार सोहळा होणार आहे. पं. कोपरकर यांनी गोव्यात दहाहून अधिक शास्त्रीय संगीत कार्यशाळा घेऊन येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे व नवदुर्गा देवस्थानचे अध्यक्ष श्याम प्रभूदेसाई हे उपस्थित असतील. मुख्य कार्यक्रमानंतर पं. विजय कोपरकर यांचा ‘नाटय़गीतांचे अंतरंग’ हा नाटय़गीतांवर आधारीत कार्यक्रम होणार आहे. संजय पंडित (पुणे) हे त्यांच्याशी संवाद साधतील. त्यांना संवादिनीवर महेश धामस्कर, ऑर्गनवर प्रदीप शिलकर व तबल्यावर विभव खांडोळकर हे साथसंगत करणार आहेत.
संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर राबविण्यात आलेल्या इतर कार्यक्रमांची मिरींगकर यांनी यावेळी माहिती दिली. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जयंत मिरींगकर यांनी यावेळी केले आहे.