पार्टीगेट प्रकरणी अविश्वास ठरावापासून बचावले ः 359 पैकी 211 खासदारांची मिळाली मते
वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. अविश्वास प्रस्ताव त्यांच्याच पक्षाच्या म्हणजेच सत्तारुढ कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या खासदारांनी मांडला होता. जॉन्सन यांनी या प्रस्तावाच्या विरोधात 59 टक्के खासदारांचे समर्थन प्राप्त पेले. एकूण 359 खासदारांपैकी 211 खासदारांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविला आहे.
कोरोना लॉकडाउनदरम्यान पार्टी करण्याचा आरोप जॉन्सन यांच्यावर होता. पार्टीगेट स्कँडलवरून दीर्घकाळापासून त्यांच्या सरकारवर दबाव होता. कोरोना संकटावेळी कठोर निर्बंधांदरम्यान जॉन्सन आणि त्यांच्या स्टाफने पंतप्रधान निवासस्थानी म्हणजेच 10 डाउनिंग स्ट्रीटवर अनेक पाटर्य़ा आयोजित केल्या होत्या. या पाटर्य़ांमुळे कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी पंतप्रधानांवरच दंड ठोठावला होता.
सरकारच्या वादग्रस्त धोरणांचा बचाव खासदार करत असताना सरकार काही काळानंतर या धोरणांमध्ये बदल करत असल्याचा आरोप त्यांच्याच्या पक्षातील अनेक खासदारांनी केला होता. याचमुळे पक्षाचे खासदार जॉन्सन यांना प्रभावी नेता मानत नव्हते. दिशाभूल करण्याच्या आरोपावरून जॉन्सन यांना अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले आहे
अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आल्यावर जॉन्सन यांच्या उत्तराधिकाऱयाची चर्चा सुरू झाली होती. जॉन्सन यांना पद गमवावे लागल्यास लिझ ट्रज, जेरेमी हंट, ऋषी सुनाक, नदीम जाहवी, पेनी मॉर्डेंट यांच्यापैकी एकाची या पदावर निवड होणार असल्याची चर्चा होती.