संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप : पार्टीगेट प्रकरणी चौकशी
वृत्तसंस्था /लंडन
ब्रिटनमध्ये पार्टीगेट प्रकरणी गुरुवारी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची चौकशी करण्यात आली आहे. जॉन्सन यांनी कोरोना लॉकडाउनच्या काळात डाउनिंग स्ट्रीटमध्ये पार्टी आयोजित केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यावरही त्यांनी संसदेला योग्य माहिती दिली नव्हती. संसदेची दिशाभूल केल्याचे जॉन्सन यांनी आता मान्य केले आहे. परंतु हा प्रकार जाणूनबुजून घडला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. जाणूनबुजून किंवा बेजबाबदारपणातून 1 डिसेंबर 2020 आणि 8 डिसेंबर 2020 रोजी किंवा अन्य कुठल्याही तारखेवरून संसदेची दिशाभूल केली नव्हती. माझ्या वकिलाने जे लिहून दिले होते, तेच मी वाचून दाखविले होते. या व्यतिरिक्त माझ्यावर झालेले आरोप निराधार असल्याचे जॉन्सन यांनी म्हटले आहे.
2020 मध्ये जगभरात कोरोना संकटामुळे अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले होते. ब्रिटनमध्ये देखील लॉकडाउन लागू करण्यात आले असल्याने सर्वप्रकारच्या सोहळय़ांवर बंदी घालण्यात आली होती. अशा स्थितीत पंतप्रधानपदी असतानाही जॉन्सन यांनी स्वतःच्या 56 व्या जन्मदिनी डाउनिंग स्ट्रीटमध्ये पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत सध्याचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह कॉन्झर्व्हेर्टिव्ह पार्टीचे अनेक मातब्बर नेते उपस्थित राहिले होते. पार्टीसंबंधीचा मुद्दा संसदेत उपस्थित झाल्यावर जॉन्सन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. यानंतर त्यांच्यावर 4 वेळा संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप झाला होता. आता याप्रकरणी ब्रिटिश संसदेची विशेषाधिकार समिती चौकशी करत आहे. जॉन्सन यांनी जाणूनबुजून संसदेची दिशाभूल केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना कनिष्ठ सभागृहाचे सदस्यत्व गमवावे लागले होते. पार्टीगेट प्रकरणामुळेच जॉन्सन यांनी जुलै 2022 मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याप्रकरणी ऋषी सुनक यांच्यावरही पोलिसांनी दंड ठोठावला होता.