चेन्नई ओपन महिला टेनिस स्पर्धा
वृत्तसंस्था/ चेन्नई
कॅनडाची माजी जागतिक पाचवी मानांकित युजेनी बुचार्डने येथे सुरू झालेल्या चेन्नई ओपन डब्ल्यूटीए 250 टेनिस स्पर्धेत विजयी प्रारंभ करताना स्वित्झर्लंडच्या जोआन झुगेरचा पराभव केला. भारताच्या वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या करमन कौर थांडीने धक्कादायक निकाल देताना आठव्या मानांकित क्लो पॅक्वेचा पराभव केला.
दुखापतीनंतर पुनरागमनाच्या मार्गावर असणाऱया बुचार्डने झुगेरवर 7-6 (7-4), 6-2 अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. 28 वर्षीय बुचार्डने पहिल्या सेटमध्ये 4-1 अशी झटपट आघाडी घेतली. पण झुगेरनेही नंतर जोरदार प्रतिकार करीत बुचार्डला संघर्ष करायला भाग पाडले. या सेटमध्ये दोघींनी चांगल्या फटक्यांचे आणि अनियंत्रित चुकांचेही प्रदर्शन घडविले. मात्र शेवटी हा सेट बुचार्डने टायब्रेकरवर जिंकून आघाडी घेतली. दुसऱया सेटमध्ये मात्र बुचार्डने वर्चस्व राखत सेटसह सामना जिंकून आगेकूच केली. मार्च 2021 नंतर तिने मिळविलेला हा पहिलाच विजय आहे. मेक्सिकोत झालेल्या त्या स्पर्धेत बुचार्डने उपविजेतेपद मिळविले होते आणि त्याच स्पर्धेत तिला खांद्याची दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तिला 17 महिने टेनिसपासून दूर रहावे लागले होते. यूएस ओपनच्या आधी तिने स्पर्धात्मक टूर्नामेंटमध्ये पुनरागमन केले. पण तिला पात्रता फेरीही पार करता आली नाही.
भारताच्या करमन कौर थांडीने आठव्या मानांकित क्लो पॅक्वेला 4-6, 6-4, 6-3 असा पराभवाचा धक्का देत दुसरी फेरी गाठली. करमन कौरला या स्पर्धेत वाईल्डकार्ड प्रवेश मिळाला असून तिने हार न मानण्याच्या वृत्तीचे प्रदर्शन घडवित पहिला सेट गमविल्यानंतरही विजय खेचून आणला. दोन तास 35 मिनिटे ही झुंज रंगली होती. अन्य सामन्यात पोलंडच्या कॅटरिना कावाने ऑस्ट्रेलियाच्या ऍस्ट्रा शर्माचा 6-4, 6-3, जपानच्या नाओ हिबिनोने क्रोएशियाच्या याना फेटचा 6-0, 6-4, कॅनडाच्या रेबेका मारिनोने रशियाच्या ऍना ब्लिन्कोव्हाचा 7-5, 7-2 असा पराभव केला.