वृत्तसंस्था/ मुंबई
2023 च्या आयपीएल हंगामासाठी दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज मार्क बाऊचरची मुंबई इंडियन्स संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाचे प्रमुख प्रशिक्षकपद लंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेकडे सोपविण्यात आले होते. पण त्यांच्या आता ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स पदाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या संघाच्या फ्रँचायझींनी प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचरकडे सोपविली आहे. मार्क बाऊचर सध्या दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर बाऊचर आपले हे प्रमुख प्रशिक्षकपद सोडणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीमागे विक्रमी झेल घेण्याचा पराक्रम मार्क बाऊचर यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीत केला आहे. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर बाऊचर यांनी प्रशिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱया राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये टायटन्स संघाचे प्रशिक्षकपद बाऊचर यांच्याकडे सोपविण्यात आले होते. 2019 साली दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी बाऊचर यांची नियुक्ती करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेने बाऊचर यांच्या मार्गदर्शनाखाली 11 कसोटी, 12 वन डे आणि 23 टी-20 सामने जिंकले आहेत. मार्क बाऊचर यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविल्याने आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स संघ दर्जेदार कामगिरी करेल, असा विश्वास या संघाचे फ्रँचायजी तसेच रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी यांनी व्यक्त केला.