ईदच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे हळहळ
प्रतिनिधी /बेळगाव
खेळता खेळता तोल जाऊन विहिरीत पडल्याने एका मुलाचा मृत्यू झाला आहे. राजहंस गल्ली, अनगोळ येथे रविवारी दुपारी ही घटना घडली असून टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
सदिद मुजम्मील मुल्ला (वय 11) मूळचा राहणार मारुती गल्ली, अनगोळ सध्या राहणार एम. के. हुबळी, ता. बैलहोंगल असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. ईद-ए-मिलादच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी पुढील तपास करीत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी 3 ते 3.15 या वेळेत ही घटना घडली आहे. खेळता खेळता धामणेकर यांच्या घरासमोरील विहिरीत पडल्यामुळे सदिद बेशुद्ध झाला. त्याला तातडीने उपचारांसाठी खासगी इस्पितळात हलविण्यात आले. इस्पितळात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.