महामार्गांवर चार्जिंग केंद्रे उभारणार :फास्ट चार्जिंगची होणार सोय
वृत्तसंस्था/ बेंगळूर
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठी बीपीसीएल कंपनी साधारण 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना बनवत आहे.
चेन्नई-त्रिची-मदुराई महामार्गावर कंपनीने अलीकडेच एक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग कॉरीडॉर स्थापन केला आहे. यायोगे बीपीसीएलने आपल्या महामार्गावरील चार्जिंग युनिटचा प्रारंभ नुकताच केला आहे.
अलीकडे इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ दिसली आहे. भारत पेट्रोलियम आगामी काळामध्ये 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून या अंतर्गत 100 फास्ट इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग कॉरिडॉर स्थापणार आहे. यामध्ये 2 हजार चार्जिंग केंद्रांची सोय करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
100 महामार्गावर चार्जिंगची सुविधा
जवळपास 100 राष्ट्रीय महामार्गांवर ही सोय आगामी काळात केली जाणार असल्याचे समजते. कंपनी आपला दुसरा कॉरीडॉर कोची-सालेम राष्ट्रीय महामार्ग 47 वर पुढील दोन महिन्यांमध्ये सुरू करणार आहे. चार्जिंग युनिट केंद्रांमध्ये आरामाची खोली, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, फूड कोर्ट व इतर सोयीसुविधाही उपलब्ध असतील.
7 हजारावर होणार केंद्रे
मार्च 2023 पर्यंत 2 हजार फास्ट चार्जिंग केंदे उभारण्याचे उद्दिष्ट कंपनीने समोर ठेवले आहे तर आर्थिक वर्ष 2025 पर्यंत हीच केंदे 7 हजारपर्यंत वाढवली जाणार असल्याचे नियोजन कंपनीने केले आहे, असे समजते.