वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंडचा क्रिकेट संघ सध्या पाकच्या दौऱयावर वनडे मालिका खेळत आहे. तसेच ही मालिका संपल्यानंतर न्यूझीलंडचा संघ भारतात येणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी क्रिकेट न्यूझीलंडने वनडे संघाची घोषणा केली होती. दरम्यान, या संघात सहभागी झालेला वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला पाकविरुद्धच्या कराचीतील दुसऱया कसोटीत खेळताना दुखापत झाली होती. त्याच्या पोटाचा स्नायू ताणला गेल्याने त्याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मॅट हेन्रीच्या जागी आता वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू डग ब्रेसवेलचा संघात समावेश करण्यात आला आहे.
मॅट हेन्रीची ही दुखापत बरी होण्यासाठी किमान महिन्याचा कालावधी जरुरीचा आहे. त्याच्यावर न्यूझीलंडमध्ये वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. या दुखापतीमुळे हेन्रीला पाक आणि भारताविरुद्धच्या मालिकांना मुकावे लागले आहे. हेन्रीच्या जागी डग बेसवेलचा समावेश करण्यात आला आहे. 32 वषीय ब्रेसवेलने आतापर्यंत 68 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले असून त्याने गोलंदाजीत 118 गडी बाद केले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला हैदराबादमध्ये 18 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. वनडे मालिकेतील शेवटचा सामना 1 फेब्रुवारीला होणार आहे. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघात टिम साऊदीच्या जागी जेकॉब डफीचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जेमिसन, ऍडॅम मिल्ने आणि बेन सिरेस हे अद्याप दुखापतीतून पूर्णपणे बरे झाले नसल्याने त्यांचा निवड समितीने विचार केला नाही.