हॉलिवूड अभिनेत्याचा चित्रपट लवकरच
जगातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक ब्रॅड पिटने आपण लवकरच चित्रपटसृष्टीतून निवृत्त होणार असल्याचे म्हटले आहे. पिटने कधीपर्यंत निवृत्त होणार हे सांगितले नसले तरीही चित्रपटसृष्टीत आपला अखेरचा टप्पा सुरू असल्याचे नमूद केले आहे. लॉकडाउननंतर अनेक गोष्टी बदलल्या असल्याचे त्याचे सांगणे आहे.
चित्रपटसृष्टीतून बाहेर पडल्यावर नेमके काय वाटेल हे माहित नाही. स्वतःच्या कलेसाठी ओळखल्या जाणाऱया लोकांपैकी मी एक आहे. मी नेहमीच अभिनयाच्या क्षेत्रात राहू इच्छितो असे त्याने म्हटले आहे. ब्रॅडने अलिकडेच ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’मधील सहाय्यक भूमिकेसाठी ऑस्कर प्राप्त केला होता.
पूर्वी मी केवळ इतरांसोबत पुढे जात होतो. आयुष्यातील अनेक वर्षे मी सौम्य नैराश्यात घालविली आहेत. स्वतःची चांगली आणि वाईट बाजू समजून घेतली नाही तोवर हे घडत राहिले. आता मी आनंदाचे क्षण जगत असल्याचे ब्रॅड म्हणाला.
ब्रॅड पिट स्वतःची पूर्वाश्रमाची पत्नी अँजेलिना जोलीसोबत कायदेशीर वादात अडकला आहे. ब्रॅडने अँजेलिना विरोधात वाइन बिझनेसमधील हिस्सेदारी विकण्याच्या विरोधात खटला दाखल केला आहे. तर ब्रॅडचा आगामी चित्रपट ‘बुले ट्रेन’ 5 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.