नायजेरियाची न्यूझीलंडवर एकतर्फी मात
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
फिफा यू-17 महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील शुक्रवारी येथे झालेली संभाव्य विजेत्या मानल्या जाणाऱया ब्राझील व अमेरिका यांची लढत 1-1 अशी बरोबरीत राहिली तर गोव्यातील मडगाव येथे झालेल्या सामन्यात आफ्रिकन चॅम्पियन्स नायजेरियाने न्यूझीलंड महिलांचा 4-0 असा एकतर्फी धुव्वा उडविला.
गट अ मधील सामन्यात ब्राझील व अमेरिका यांनी वेगवान खेळ करीत बरोबरी साधत उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने वाटचाल केली. निकोलेट किओर्पेसने 33 व्या मिनिटाला गोल नोंदवत अमेरिकेला आघाडी मिळवून दिली. पण चारच मिनिटानंतर कॅरोलने ब्राझीलला बरोबरी साधून देणारा गोल नोंदवला. अखेरच्या टप्प्यात ब्राझीलने विजयी गोलसाठी जोरदार प्रयत्न केले. पण अमेरिकन बचावपटूंनी भक्कम बचाव करीत त्यांना यश मिळू दिले नाही.
या अनिर्णीत सामन्यामुळे भारत व मोरोक्को यांच्या उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. ब्राझील व अमेरिका यांचे प्रत्येकी 4 गुण झाले असून ब्राझीलची शेवटची साखळी लढत यजमान भारताविरुद्ध व अमेरिकेची लढत मोरोक्कोविरुद्ध सोमवारी होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला अमेरिकेकडून 0-8 असा तर मोरोक्कोला ब्राझीलकडून 0-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता.
मडगाव येथे झालेल्या गट ब मधील एका सामन्यात नायजेरियाने न्यूझीलंडचा 4-0 असा पराभव केला. अमिना बेलो (16 वे मिनिट), मिरॅकल युसानी (34), तायवो अफोलाबी (75) व एडिडिआँग एतिम (95) यांनी नायजेरियाचे गोल नोंदवले. न्यूझीलंडचा हा सलग दुसरा पराभव असून पहिल्या सामन्यात त्यांना चिलीकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. नायजेरियाही पहिल्या सामन्यात जर्मनीकडून 1-2 असे पराभूत झाले होते.