वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम (ब्रिटन)
रविवारी येथे झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील बर्मिंगहॅम खुल्या महिलांच्या ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत ब्राझीलच्या बियाट्रिझ हदाद माइयाने एकेरीचे जेतेपद मिळविताना चीनच्या झेंग शुईचा पराभव केला.
या अंतिम सामन्यात पहिल्या सेटमध्ये बियाट्रिझ माइया 5-4 अशा आघाडीवर असताना चीनच्या शुईने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे स्पर्धा आयोजकांनी मायाला विजेती म्हणून घोषित करण्यात आली. गेल्या सात दिवसांच्या कालावधीतील बियाट्रिझ माइयाचे हे दुसरे विजेतेपद आहे. माइयाने ग्रासकोर्टवरील स्पर्धेत अलिकडच्या कालावधीत सलग दहा सामने जिंकले आहेत. माइयाने नॉटींगहॅम टेनिस स्पर्धेत गेल्या आठवडय़ात विजेतेपद पटकाविले होते. 26 वर्षीय बियाट्रिझ माइया आता आगामी विंबल्डन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. विंबल्डन स्पर्धेत तिला यापूर्वी तिसरी फेरी पार करता आलेली नाही.