Tarun Bharat

इंग्लंडकडून 112 वर्षांचा जुना विक्रम मोडीत

कसोटीत पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या डावात चार फलंदाजांची शतके

वृत्तसंस्था /रावळपिंडी

यजमान पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील गुरुवारपासून येथे सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीतील खेळाच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने पहिल्या डावात 75 षटकात 4 बाद 506 धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडतर्फे क्रॉले, डकेट, ओली पॉप आणि हॅरि बुक यांनी शानदार शतके झळकविली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंड संघाने एका दिवसात 494 धावांची नोंद झालेला 112 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.

या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्रॉले आणि डकेट या सलामीच्या जोडीने 35.4 षटकात 233 धावांची द्विशतकी भागीदारी केली. पाकची गोलंदाजी झोडपून काढताना डकेटने 110 चेंडूत 15 चौकारांसह 107 धावा जमविल्या. पाकच्या झाहीद मेहमूदने त्याला पायचीत केले. त्यानंतर पाठोपाठ सलामीचा फलंदाज क्रॉली हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 111 चेंडूत 21 चौकारांसह 122 धावा झळकविल्या. त्यानंतर ओली पॉप आणि रुट यांनी तिसऱया गडय़ासाठी 51 धावांची भागीदारी केली. पाकच्या झाहीद मेहमूदने रुटला पायचीत केले. त्याने 3 चौकारांसह 31 धावा जमविल्या. रुट बाद झाल्यानंतर पॉप आणि ब्रुक या जोडीने इंग्लंडची स्थिती अधिक मजबूत करताना चौथ्या गडय़ासाठी 176 धावांची भागीदारी केली. मोहम्मद अलीने पॉपला पायचीत केले. त्याने 104 चेंडूत 14 चौकारांसह 108 धावा झळकविल्या. बुक आणि स्टोक्स या जोडीने पाचव्या गडय़ासाठी अभेद्य 44 धावांची भर घातली आहे. ब्रुक 81 चेंडूत 2 षटकार आणि 14 चौकारांसह 101 धावांवर तर कर्णधार स्टोक्स 15 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 34 धावांवर खेळत आहे. खेळाच्या पहिल्या दिवशी इंग्लंडतर्फे शतक नोंदविणारा बुक हा चौथा फलंदाज ठरला. पाकतर्फे झाहीद मेहमूदने 2 तर मोहम्मद अली आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये 1910 साली डिसेंबरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात पहिल्या दिवशी 494 धावा जमविल्या गेल्या होत्या. हा विक्रम 112 वर्षे अबाधित राहिला होता. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाच्या पहिल्या दिवशी 500 पेक्षा अधिक धावा जमविण्याची ही चौथी खेप आहे. यापूर्वी इंग्लंडने हा पराक्रम तीन वेळा तर लंकेने एकदा ही कामगिरी केली होती. 2012 च्या नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील झालेल्या कसोटी सामन्यात खेळाच्या पहिल्याच दिवशी 482 धावा नोंदविल्या गेल्या होत्या. कसोटीमध्ये एका दिवसात 588 सर्वाधिक धावा नोंदविण्याचा विक्रम 1936 साली भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात नोंदविला गेला होता. यजमान इंग्लंडतर्फे या कसोटीतील खेळाच्या दुसऱया दिवशी नोंदविलेला हा विक्रम अद्याप अबाधित आहे.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड प. डाव 75 षटकात 4 बाद 506 (क्रॉली 122, डकेट 107, ओली पॉप 108, रुट 23, ब्रुक खेळत आहे 101, स्टोक्स खेळत आहे 34, झाहीद मेहमूद 2-107, मोहम्मद अली 1-96, हॅरिस रौफ 1-78).

Related Stories

पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी नव्याने तयारी करेन

Patil_p

अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतून बेन्सिकची माघार

Patil_p

नेपाळचा युएईवर पहिला मालिका विजय

Patil_p

रवींद्र जडेजा सर्वोत्तम भारतीय क्षेत्ररक्षक : ब्रॅड हॉग

Patil_p

2023 पर्यंत एक हजार ‘खेलो इंडिया’ केंद्रांना मंजुरी

datta jadhav

आशियाई युवा बॉक्सिंग – चोंगथमला सुवर्णपदक

Patil_p