काँगेसच्या दोन आमदारांसह काही रक्षक रुग्णालयात
थिरुवनंतरपुरम / वृत्तसंस्था
केरळच्या विधानसभेत प्रचंड मारामारी झाली असून दोन काँगेस आमदारांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची वेळ आली आहे. त्यांच्यासह विधानसभेतील काही सुरक्षा रक्षक (वॉर्डन्स) जखमी झाले असून त्यांनाही रुग्णालयात हलविण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांनी काँगेस आमदाराला स्थगन प्रस्ताव मांडण्यास अनुमती न दिल्याने मारामारीला प्रारंभ झाला.
केरळच्या चेंगोतुकोनम येथील एका युवतीवर काही समाजकंटकांनी हल्ला केला होता. हे स्थान राजधानी थिरुवनंतपुरमच्या जवळ आहे. हल्लेखोरांना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे काँगेस आमदार उमा थॉमस यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. राज्यापील कायदा-सुव्यवस्था परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे आपण नियम 50 अंतर्गत स्थगन प्रस्ताव देत आहोत, असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. मात्र, विधानसभा अध्यक्ष ए. एन. शमशीर यांनी स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे काँगेस सदस्य संतप्त झाले.
आमदारांची निदर्शने
संतप्त काँगेस आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ गर्दी करुन घोषणा दिल्या. त्यांनी कम्युनिस्ट राज्यसरकाराच्या विरोधात निषेध व्यक्त केला, तसेच सरकारच्या विरोधातील बॅनर्स फडकविले. यामुळे विधानसभा कामकाज अशक्य झाले. र्त्याच्या घोषणाबाजीला सत्ताधारी आमदारांनी तशाच प्रकारे प्रतिसाद दिला. त्यामुळे मोठा गदारोळ झाला. याचवेळी दोन्ही बाजूंचे सदस्य एकमेकांवर धावून गेले. त्यांच्यात प्रचंड धुमश्चक्री आणि मारामारी झालीं. विधानसभा अध्यक्षांनी कामकाज वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला. मारामारी होण्याच्या अगोदर काही क्षण राज्याचे सार्वजनिक काम मंत्री मोहम्मद रियास यांनी अश्लाघ्य शब्दांमध्ये टिप्पणी केली. विरोधी पक्षांचे सदस्य हे कणाहीन असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. त्यामुळे काँगेस आमदारांच्या संतापाचा भडका उडाला. त्यानंतर मारामारीला प्रारंभ झाला.
सभाध्यक्षांची कोंडी
विधानसभेच्या अध्यक्षांची या काळात काँगेस आणि संयुक्त लोकशाही मोर्चाच्या आमदारांनी कोंडी केली होती. त्यांना त्यांच्या आसनावरुन उठणे अशक्य झाले होते. अखेरीस रक्षकांना पाचारण करण्यात आले. आमदारांनी रक्षकांवरही हात उगारला. त्यामुळे काही रक्षक जखमी झाले दोन काँगेस आमदारांना यावेळी जखमा झाल्या. तसेच त्यांना भोवळ येऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. विधानसभा अध्यक्ष त्यांच्या कक्षात परत जात असतानाही त्यांची कोंडी करण्यात आली. केवळ विधानसभेत असा प्रकार प्रथमच घडल्याचे बोलले जात आहे.