जिनपिंग-पुतिन यांच्यासोबत दिसणार पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या 24 जून रोजी ब्रिक्स परिषद प्रस्तावित आहे. या ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन एका व्हर्च्युअल व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत. युपेन-रशिया युद्धानंतर पहिल्यांदाच रशिया-चीन आणि भारत एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. ‘ब्रिक्स’ हा एक बहुपक्षीय मंच असून त्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या जगातील पाच प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समावेश आहे.
पुढील महिन्यात होणाऱया या बैठकीमध्ये प्रथमच ‘ब्रिक्स’ गटामध्ये नवीन विकसनशील देशांच्या सदस्यांचा समावेश करण्यासाठी विस्तार प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे. चीन ब्रिक्सच्या विस्तारास सक्रियपणे प्रोत्साहन देईल आणि समूहात सामील होण्यासाठी अधिक जागतिक भागीदारांचे स्वागत करेल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच स्पष्ट केले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी ब्रिक्सच्या विस्ताराबाबत चीनच्या दृष्टिकोनावर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना हे वक्तव्य केले. भारताने मात्र यासंबंधी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.
ब्रिक्सच्या विस्तारावर सखोल चर्चा सुरू ठेवण्यासाठी चीन ब्रिक्स पक्षांसोबत काम करेल आणि सहमतीच्या आधारावर त्यासाठीचे मानके आणि कार्यपद्धती निश्चित करेल. आम्ही अधिक समविचारी भागीदार ब्रिक्सच्या मोठय़ा कुटुंबात सामील होण्याची अपेक्षा करतो, असे वेनबिन यांनी म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत या उपक्रमावर चर्चा झाली होती. तसेच मंत्रीस्तरीय बैठकीत ‘ब्रिक्स प्लस’वर सल्लामसलतही झाली, यावर वांग वेनबिन यांनी भर दिला.