ब्रिटिश संगीत-संस्कृतीचा वारसा, ऐतिहासिक परंपरेला उजाळा
बर्मिंगहम / वृत्तसंस्था
वैभवशाली ब्रिटिश संगीत-संस्कृतीचा वारसा आणि वैविध्याचा अनोखा नजराणा सादर करत 22 व्या बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले. रोषणाई, संगीत व नृत्यात न्हाऊन निघालेल्या या सोहळय़ात दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली.
ड्रमर-पर्कशनिस्ट अब्राहम पॅडी टेटेहने जॅमपॅक अलेक्झांडर स्टेडियमवर जोरदार सुरुवात केली आणि त्यानंतर भारतीय क्लासिकल व्होकलिस्ट व कम्पोझर रंजना घटकने सर्व सूत्रे हाती घेत शहरातील वैविध्याची प्रचिती आणून दिली. कोरोनाशी संलग्न प्रतिबंध हटवल्यानंतर ही पहिलीच मल्टि-डीसिप्लिन स्पर्धा आहे.
लाल, पांढऱया व निळय़ा 70 कार्सच्या माध्यमातून युनियन जॅक साकारले गेले आणि त्यात राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे प्रतिनिधी म्हणून प्रिन्स चार्ल्सचे ऍस्टॉन मार्टिन कारमधून आगमन झाले. डचेस ऑफ कॉर्नवलही यावेळी हजर राहिले. येथील मोटर इंडस्ट्री इतिहासाच्या वैभवशाली इतिहासाचा दाखला या माध्यमातून देण्यात आला.
त्यापूर्वी, बर्मिंगहमची संस्कृती व विविधतेचे एका आर्टमधून सादरीकरण केले गेले. चार्ली चाप्लीन यांच्या योगदानाला उजाळा देणारी कलाकृतीही सादर केली गेली. बर्मिंगहममध्ये विल्यम शेक्सपियर यांच्या साहित्यावर आधारित युकेतील सर्वात मोठे सार्वजनिक वाचनालय कसे कार्यरत आहे, याची झलक या माध्यमातून मांडण्यात आली. या स्पर्धेचे शुभंकर पेरी द बुलला शहरातील बुल रिंग मार्केटचे नाव देण्यात आले असून या माध्यमातून शेकडो वर्षांचा इतिहास जपण्याचा आयोजकांचा प्रयत्न राहिला.
‘92 वर्षांच्या इतिहासात यंदाची स्पर्धा सर्वात वैशिष्टपूर्ण असेल. 72 देश व प्रांत सहभागी झाले असून ही स्पर्धा आजवरची सर्वाधिक महत्त्वाची आणि महानतम ठरु शकते’, असे राष्ट्रकुल स्पर्धा फेडरेशनच्या अध्यक्षा लुईसे मार्टिन म्हणाल्या.
त्यानंतर सहभागी देशांची परेड सुरु झाली व राष्ट्रकुल परंपरेप्रमाणे मागील राष्ट्रकुल स्पर्धेतील यजमान ऑस्ट्रेलियाला परेडमध्ये पहिले स्थान मिळाले. त्यानंतर ओशियन रिजनमधील देशांनी संचलन केले. आफ्रिका, अमेरिका, आशिया, कॅरेबियन देशांच्या संचलनानंतर 2010 स्पर्धेचे यजमान भारतीय पथकाने सहभाग घेतला. दुहेरी ऑलिम्पिक पदकजेती पीव्ही सिंधू व पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी पथकाचे नेतृत्व केले. त्यानंतर यजमान इंग्लंडचे पथक ‘वुई विल, वुई विल रॉक यू’ संगीताच्या गजरात दाखल झाले. या सोहळय़ाच्या प्रारंभीच स्टेडियमवर मोठय़ा संख्येने हजर राहिलेल्या प्रेक्षकांनी मेक्सिकन वेव साकारत या सोहळय़ाला खऱया अर्थाने नव्या उंचीवर नेले. यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये 72 देशातील 5 हजारहून अधिक ऍथलिट सहभागी झाले असून ते 15 ठिकाणी 19 क्रीडा प्रकारातील 280 इव्हेंट्समध्ये आव्हान उभे करणार आहेत.
पीव्ही सिंधू, मनप्रीतकडे पथकाच्या नेतृत्वाचा सन्मान
येथील शानदार उद्घाटन सोहळय़ात भारतीय पथकाचे नेतृत्व ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधू व पुरुष हॉकी कर्णधार मनप्रीत सिंग यांनी भूषवले. अलेक्झांडर स्टेडियमवर आयोजित या सोहळय़ात सिंधू व मनप्रीत यांनी ही जबाबदारी पार पाडली. पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे ऑलिम्पिक सुवर्णजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला हा सन्मान प्रदान केला जाणार होता. पण, ऐनवेळी दुखापत उदभवल्याने तो स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाले.
पथसंचलनात सहभागी भारतीय पथकात पीव्ही सिंधू, मनप्रीतसह मिराबाई चानू, लवलिना बोर्गोहेन, बजरंग पुनिया, रवि कुमार दहिया, विद्यमान राष्ट्रकुल चॅम्पियन मनिका बात्रा, विनेश फोगट, 2018 आशियाई सुवर्णजेता तजिंदरपाल सिंग तूर, हिमा दास, अमित पांघल यांचा प्राधान्याने समावेश राहिला.
पंतप्रधानांकडून भारतीय पथकाला शुभेच्छा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्मिंगहम 2022 राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाला शुभेच्छा दिल्या. ‘बर्मिंगहममध्ये सहभागी होत असलेल्या पथकाला शुभेच्छा. आमचे सर्व ऍथलिट सर्वोत्तम कामगिरी साकारतील आणि सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या माध्यमातून देशवासियांना प्रेरणा देत राहतील’, असा विश्वास त्यांनी ट्वीटरवर व्यक्त केला. भारतीय संघाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर व दिगज फलंदाज विराट कोहलीने देखील पथकाला शुभेच्छा दिल्या.