महिलांचा अनोखा कॅफे, मातीच्या भांडय़ांमध्ये करतात स्वयंपाक
एखाद्या दिवशी सकस आहार घेण्याची इच्छा असेल आणि खिश्यामध्ये पैसे नसले तरीही टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही घरातून प्लास्टिक कचरा उचलून घेत ‘प्राकृतिक प्लास्टिक कॅफे’मध्ये जाऊ शकतात. तेथे अर्धा किलो प्लास्टिक कचरा जमा केल्यास तुम्ही सरबताचा आनंद घेऊ शकाल आणि एक किलो प्लास्टिक कचऱयावर विविधप्रकारचे स्वादिष्ट पक्वान चाखू शकाल. म्हणजेच येथे पोट भरण्यासाठी एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. घरातील प्लास्टिक कचऱयाच्या बदल्यात जूनागढ येथील प्राकृतिक प्लास्टिक कॅफे लोकांना पोटभर नाश्ता पुरवत आहे.
या कॅफेची धुरा महिलांच्या हातात आहे. या कॅफेमध्ये संपूर्ण स्वयंपाक मातीच्या भांडय़ांमध्ये तयार केला जातो. हा पूर्णपणे कॅशलेस कॅफे आहे. कॅफेत 500 ग्रॅम प्लास्टिक जमा केल्यावर लोक निंबूपाणी, सरबत, आवळा ज्यूस, चहा आणि कॉफीचा आनंद घेऊ शकतात. तर एक किलोग्रॅम प्लास्टिक जमा केल्यावर लोकांना 1 प्लेट पोहे, ढोकळा, बटाटा पोहे, बाजऱयाची भाकरी, भाजी, थेपला इत्यादी पदार्थांची चव चाखता येणार आहे. कॅफेच्या मेन्यूमध्ये काठियावाडी प्लॅटर आणि गुजराती प्लॅटरही सामील करण्यात आले आहे.


कॅफेत तयार होणाऱया सर्व गोष्टी नैसर्गिक असतील, यासाठी थेट ऑर्गेनिक फार्मिंग करणाऱया शेतकऱयांशी टाय-अप करण्यात आले आहे. या कॅफेमध्ये भाज्यांची विक्री देखील होणार आहे. सेंद्रीय शेतीद्वारे पिकविण्यात आलेली भाजीच येथे उपलब्ध होईल.
तर जमा होणारे प्लास्टिक पुनर्वापर करू पाहणाऱया कंपन्यांना विकले जाणार आहे. या प्लास्टिकच्या बदल्यात मिळणाऱया पैशांमधून महिलांना नफा कमावता येणार आहे. या कॅफेला स्विगी आणि झोमॅटो यासारख्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी ऍपशीही जोडण्यात आले आहे. आगामी काळात लोक घरबसल्या प्लास्टिक कचरा देऊन ऑर्डर करू शकतील.