केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग यांचे आवाहन : ‘हर घर जल’ मिशन गोव्यात 100 टक्के पूर्ण,पाणी बिले भरण्यासाठी क्यूआर कोडचा शुभारंभ
प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी पणजीत काल शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या आनंद सोहळ्य़ात गोव्यातील तळी संवर्धन व पाण्याची बिले भरण्यासाठी तयार केलेल्या क्यूआर कोडचा शुभारंभ केला. ‘हर घर जल मिशन’ गोव्याने 100 टक्के साकार केल्याचे त्यांनी जाहीर करुन त्याचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केले. पाणी वितरणात चांगला दर्जा, मुबलकता आणि समानता अत्यावश्यक असून त्यावर भर देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. ‘हर घर जल’ मिशनबद्दल त्यांनी गोमंतकीय जनतेचे अभिनंदन केले आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी गोमंतकीयांनी केलेल्या बलिदानाची आठवण करुन दिली. मिनेझिस ब्रागांझा हॉलमध्ये हा सोहळा साजरा करण्यात आला होता.
गावांना स्वावलंबी बनवावे : मुख्यमंत्री
डॉ. सावंत यांनी तळी पुनरुज्जीवित करणे व पाणी बिलांसाठी क्यूआर कोड विकसित केल्याबद्दल आनंद झाल्याचे सांगून अशा कामांसाठी सरकार पूर्ण सहकार्य देणार असल्याचे नमूद केले. ग्राम स्वराज्य अधिक बळकट व स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी काम करावे आणि गावांना स्वावलंबी बनवावे, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. ‘हर घर जल’ हे मिशन गोमंतकीय जनतेसाठी अभिमानास्पद असून आपले राज्य त्याकरिता देशात प्रथम ठरले ही आनंदाची गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
ऍलन लोबो यांच्याकडून क्यूआर कोड विकसित
पाण्याची बिले भरण्यासाठी हळदोणा येथील ऍलन लोबो यांनी क्यूआर कोड विकसित केला असून त्यांनी कोणाचीही मदत न घेता तो एकटय़ाने तयार केल्याची माहिती देण्यात आली. ते काम करताना त्यांनी दर्जात कुठेही तडजोड केलेली नाही. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी हा क्यूआर कोड तयार केला होता.
पाणी पुरवठा 24ƒ7 साध्य होणार : शिरोडकर
जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘हर घर जल’ मिशन गोवा राज्यात 100 टक्के पूर्ण झाले असून 24ƒ7 पाणी पुरवठा देखील साध्य होणार असल्याची खात्री त्यांनी बोलताना व्यक्त केली.
लवकरच दोन पाणी प्रकल्प सुरु होणार : काब्राल
सरकारतर्फे 85 एमएलडी आणि 165 एमएलडी असे दोन पाणी प्रकल्प लवकरच पूर्णत्वास नेऊन सुरु करण्यात येणार असून त्यानंतर 24ƒ7 पाणी पुरवठा करणे शक्य होईल, अशी आशा सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी वर्तविली. सांडपाणी निचरा यंत्रणाही मार्गी लावणार असून त्यासाठी जागा व प्रकल्प यांची गरज आहे. त्या यंत्रणेत गोवा थोडा मागे आहे पण त्यातही प्रगती करु, असेही ते म्हणाले.
जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल उत्सव’ पणजीतील ब्रागांझा हॉलमध्ये साजरा करण्यात आला. ऑनलाईन मार्गाने पाणी बिले भरण्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याने क्यूआर कोडची संकल्पना पुढे आली व सत्यात उतरली, अशी माहिती कार्यकारी अभियंता विश्वंभर भेंडे यांनी दिली.
पंतप्रधानांनी गोमंतकीयांचे, सरकारचे केले अभिनंदन!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ‘हर घर जल’ मिशन गोवा राज्याने 100 टक्के पूर्ण केले म्हणून गोव्याचे अभिनंदन केले. तसेच हे ध्येय साध्य करणारे गोवा देशातील पहिले राज्य ठरल्याचे सांगितले. प्रत्येक गोमंतकीयाचे आणि प्रामुख्याने महिलांचे आपण अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले. हे मिशन साध्य केल्याबद्दल गोवा सरकारतर्फे पणजीतील मिनेझिस ब्रागांझा हॉलमध्ये आनंद सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी मोदींनी संवाद साधताना वरील भाष्य केले. क्यूआर कोडची देखील त्यांनी प्रशंसा केली तसेच ध्येय साधेसुधे नसल्याचे ते म्हणाले.