भारताच्या राष्ट्रपतींसह देश-विदेशातील नेत्यांची उपस्थिती
लंडन / वृत्तसंस्था
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर आज, 19 सप्टेंबरला अंत्यसंस्कार केले जातील. त्यांचे कुटुंबीय, राजकीय नेते आणि जगभरातील नेते स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 11 वाजता त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी एकत्र जमतील. महाराणींवरील अंत्यसंस्कारामुळे सोमवारी ब्रिटनमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी भारताच्यावतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिवारीच लंडनमध्ये दाखल झाल्या आहेत. भारत सरकारच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी मुर्मू 17 ते 19 सप्टेंबर या कालावधीत ब्रिटनच्या अधिकृत दौऱयावर आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे पत्नी जिल बिडेनसह लंडनमध्ये दाखल झाले आहेत.
ब्रिटनच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे 8 सप्टेंबर 2022 रोजी वयाच्या 96 व्या वषी निधन झाले आहे. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराणी एलिझाबेथ यांच्या शेवटच्या क्षणी त्यांचे आप्तस्वकीय स्कॉटलंड येथील त्यांच्या बालमोरल या निवासस्थानी उपस्थित होते. अंत्यसंस्कारापूर्वी महाराणी एलिझाबेथ यांची अंत्ययात्रा गेल्या रविवारीच सुरू झाली. त्यानंतर कित्येक लोकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. आता सोमवार, 19 सप्टेंबरला संपूर्ण राजकीय सन्मानासह महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना अंतिम निरोप दिला जाईल.
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर भारतात एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला होता. दुखवटय़ामुळे शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यापर्यंत खाली उतरवण्यात आले होते. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या स्मृतिनिमित्त आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशात एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तसेच राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, परराष्ट्रमंत्री आदींनी शोकसंदेशपर भावनाही नातेवाईक आणि ब्रिटनच्या प्रशासकीय विभागापर्यंत पोहोचवल्या होत्या.