खासदारांनी केली राजीनाम्याची मागणी : ऋषी सुनक परतण्याची शक्यता
वृत्तसंस्था /लंडन
ब्रिटनचे पंतप्रधानपद स्वीकारल्याच्या 40 दिवसांनीच लिझ ट्रस यांचे सरकार अडचणीत आले आहे. कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीतच आता विरोधाचे सूर उमटले आहेत. ट्रस यांना 24 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानपदावरून हटविले जाण्याची शक्यता आहे. पक्षाचे 100 खासदार ट्रस यांच्या विरोधात लवकरच अविश्वास प्रस्ताव सादर करणार आहेत. सत्तारुढ कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे खासदार पंतप्रधान ट्रस यांच्या भवितव्याचा निर्णय घेणार आहेत. याचदरम्यान नवे पंतप्रधान म्हणून भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांची दावेदारी अधिकच मजबूत झाली आहे. सुनक पुढील पंतप्रधान होणार असल्याचे सट्टेबाजांचेही मानणे आहे.
पक्षात नेतृत्व परिवर्तन करण्याची गरज असल्याचे कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या खासदारांचे मानणे आहे. ट्रस यांना त्वरित राजीनामा द्यावा असे बहुतांश खासदारांचे म्हणणे आहे. पंतप्रधान म्हणून ट्रस यांना स्वतःची छाप पाडता आली नसल्याचे मत खासदारांनी व्यक्त केले आहे. ट्रस सरकारचा लघू अर्थसंकल्प अंगलट आला आहे. अर्थमंत्री क्वासी यांना पदावरून हटविल्याने जनतेत चुकीचा संदेश गेला आहे.
आर्थिक विषयांची जाण असणाऱया सुनक यांच्याशी कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीचा कुठलाच खासदार स्पर्धा करू शकत नसल्याचे म्हटले जात आहे. सुनक हेच ब्रिटनला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकतात असे त्यांच्या समर्थक खासदारांचे म्हणणे आहे. ब्रिटिश पाउंड डॉलरच्या तुलनेत नीचांकी स्तरावर आहे. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे मध्यमवर्गात रोष निर्माण झाला आहे. रशियाकडून होणारा इंधनपुरवठा थांबल्याने आणि हिवाळा तोंडावर आल्याने याप्रकरणी लवकरात लवकर पावले उचलण्याची गरज आहे. ट्रस सरकारच्या आर्थिक विषयासंबंधीच्या घुमजावामुळे समस्या अधिकच तीव्र झाल्या आहेत.
यूगॉवच्या एका नव्या सर्वेक्षणानुसार 62 टक्के ब्रिटिश लोकांनी पक्षाच्या मतदारांनी पंतप्रधान म्हणून ट्रस यांची केलेली निवड चुकीची होती असे मत व्यक्त केले आहे. ट्रस यांनी अर्थमंत्री क्वासी यांना चुकीचा अर्थसंकल्प सादर करण्यास भाग पाडले आणि स्वतःची जबाबदारी झटकल्याचे बहुतांश लोकांचे मानणे आहे.
सुनक यांना पाठिंबा
खासदार ऋषी सुनक यांच्याकडे स्वतःच्या पक्षाच्या 250 खासदारांपैकी 137 जणांचा पाठिंबा आहे. तर ट्रस यांना 113 खासदारांचे समर्थन आहे. सुनक सध्या सत्तानाटय़ाबद्दल मौन बाळगून आहेत. चालू महिन्याच्या प्रारंभी झालेल्या पक्षाच्या बैठकीतही ते सहभागी झाले नव्हते.
पेनी मॉर्डोन्ट देखील शर्यतीत
ब्रिटिश संसदेतील पक्षाच्या नेत्या पेनी मॉर्डोन्ट या ट्रस यांच्या विरोधक आहेत. पंरतु पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पेनी यांनी सुनक यांनाही विरोध दर्शविला होता. ट्रस यांना हटविण्यात आल्यास पेनी या पंतप्रधानपदासाठी स्वतःही दावा करू शकतात. कॉन्झर्व्हेटिवह पार्टीच्या 1922 कमिटीचे अध्यक्ष सर बेंडी हे नव्या पंतप्रधानाच्या निवडणुकीच्या मतदानावर निर्णय घेतील. यापूर्वी त्यांनी जॉन्सन आणि थेरेसा मे यांना पदावरून हटविण्याचा निर्णय दिला होता.
लेबर पार्टीला लाभ
ब्रिटनमध्ये सत्तारुढ कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीत सुरू असलेल्या राजकीय संघर्षादरम्यान विरोधी पक्ष असणाऱया लेबर पार्टीला लाभ मिळत आहे. यूगॉव पोलनुसार लेबर पार्टीचे नेते कीर स्टारमर यांना 65 टक्के लोकांनी ट्रस यांच्यापेक्षा अधिक चांगले ठरविले आहे. लेबर पार्टीच्या लोकप्रियतेत एक महिन्यात 35 टक्क्यांची भर पडली आहे.