नवी दिल्ली
बेकरी उत्पादने कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीजने केनियाच्या केनाफ्रिक बिस्किट्समध्ये हिस्सा विकत घेतला आहे. ब्रिटानिया इंडस्ट्रीजने शेअर बाजाराला पाठवलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली आहे.
या निर्णयामुळे कंपनीला निर्मिती प्रक्रिया बळकट करता येणार असून आफ्रिकन बाजारपेठेत विक्री वाढविण्यात मदत होणार असल्याची माहिती आहे. नियामक अधिसूचनेनुसार, कंपनीच्या पूर्ण मालकीची उपकंपनी ब्रिटानिया अँड असोसिएट्स (दुबई) प्रायव्हेट कंपनी लिमिटेडने केनाफ्रिक बिस्किट्स लिमिटेडमध्ये 51 टक्के भाग विकत घेतला आहे.
ब्रिटानियाने 13.87 कोटी केनियन शिलिंग म्हणजेच 9.2 कोटी रुपयांना हे अधिग्रहण केले आहे. ब्रिटानिया इंडस्ट्रीजने सांगितले की, केनिया आणि आफ्रिकन बाजारपेठेत बिस्किटांचे उत्पादन आणि विक्री करणे हा या अधिग्रहणाचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे.
कंपनी देशांतर्गत बाजारात गुड डे, टायगर, न्यूट्रीचॉइस आणि मेरी गोल्ड सारख्या बिस्किट ब्रँडची विक्री करते. ब्रिटानिया इंडस्ट्रीजने सदरचे अधिग्रहण 3 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्ण झाले असल्याचे म्हटले आहे.