संयुक्त राष्ट्र / वृत्तसंस्था
ब्रिटनने विस्तारित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझीलच्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दिला आहे. ब्रिटन दीर्घकाळापासून सुरक्षा परिषदेच्या स्थायी आणि अस्थायी अशा दोन्ही श्रेणींमधील विस्तारासाठी प्रयत्न करत असल्याचे ब्रिटनच्या राजदूत बार्बरा वुडवर्ड यांनी सुरक्षा परिषदेच्या सुधारणांवरील आमसभेच्या चर्चेदरम्यान सांगितले. आमची भूमिका सर्वश्रुत आहे. आम्ही परिषदेवर कायमस्वरूपी आफ्रिकन प्रतिनिधित्व तसेच भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझीलसाठी नवीन कायमस्वरूपी जागा निर्माण करण्यास समर्थन देतो. आम्ही तात्पुरत्या श्रेणीच्या विस्तारास देखील समर्थन देतो, असे बार्बरा वुडवर्ड पुढे म्हणाल्या. या बदलांमुळे परिषद सध्याच्या जगाचे अधिक प्रतिनिधीत्व करणार आहे. सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांपैकी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया यांनी भारताच्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दिला आहे. मात्र, चीनचा पाठिंबा मिळण्याची आशा धुसर असल्यामुळे भारताच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण होताना दिसत आहे.