इजिप्तमधील वर्ल्ड चॅम्पियनशिप रायफल-पिस्तुल नेमबाजी स्पर्धा
वृत्तसंस्था/ कैरो
येथे सुरू झालेल्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप रायफल-पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ महिला संघाने कांस्यपदक पटकावत मोहिमेची सुरुवात केली. कनिष्ठ महिलांच्या 25 मी. सांघिक पिस्तुल नेमबाजीत भारताने हे पदक पटकावले.
इशा सिंग, नाम्या कपूर व विभूती भाटिया या त्रिकुटाने जर्मनी कनिष्ठ संघाचा 17-1 असा एकतर्फी पराभव करून स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कांस्यपदक मिळविले. पात्रतेच्या पहिल्या फेरीत इशा, नाम्या, विभूती यांनी 856 गुण नोंदवत चौथे स्थान मिळविले. पुढील फेरीत त्यांनी 437 गुण घेत जर्मनीनंतर चौथे स्थान मिळवित कांस्यपदकाच्या फेरीसाठी पात्रता मिळविली होती. चीनने या प्रकारात सुवर्ण व कोरियाने रौप्यपदक मिळविले.
कनिष्ठ महिलांच्या 50 मी. रायफल प्रोन स्पर्धेत भारताच्या निश्चलने 616.9 व नुपूर कुमरावतने 606.6 गुण नोंदवत अनुक्रमे आठवे व 34 वे स्थान मिळविले. याच प्रकाराच्या पुरुष विभागात मात्र भारतीयांकडून निराशा झाली. सूर्य प्रताप सिंगने (608.7) तेरावे, पंकज मुखेजाने (608.5) चौदावे, हर्ष सिंगलाने (606.0) 20 वे तर ऍड्रियन करमाकरने (603.7) 27 वे स्थान मिळविले.
50 मी. रायफल प्रोन कनिष्ठांच्या मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या दोन भारतीय जोडय़ांना दुसऱया फेरीत स्थान मिळविता आले. पात्रतेच्या पहिल्या फेरीत त्यांना अव्वल आठमध्ये स्थान मिळाल्याने त्यांना दुसऱया फेरीत खेळण्याची संधी मिळाली. यात एकूण 17 जोडय़ांनी भाग घेतला होता. सूर्य प्रताप सिंग व निश्चल यांनी या फेरीत 619.1 गुण घेत दुसरे स्थान मिळविले तर नुपूर कुमरावत व पंकज मुखेजा यांनी 612.4 गुण नेंदवत सातवे स्थान घेतले.