स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय मल्ल
वृत्तसंस्था /पाँटेवेद्रा, स्पेन
यू-23 वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या साजन भनवालाने युक्रेनच्या मल्लावर निकषाच्या आधारे मात करीत कांस्यपदक पटकावले. यू-23 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळविणारा साजन हा पहिलाच भारतीय मल्ल आहे.
कांस्यपदकाच्या प्लेऑफ लढतीत युक्रेनच्या दिमीत्रो व्हॅसेत्स्कीने चार गुणांची आघाडी घेत सुरुवात केली. पण भनवालाने मुसंडी मारत अशी चाल केली की त्यावरून दिमीत्रोला पराभूत करता येईल. त्याने त्याला चितपट केले नसले तरी चार गुण मिळविण्यात तो यशस्वी ठरला. त्याने आणखी दोन गुण गमविल्यानंतर तो बचावात्मक खेळू लागला. कोणतीही हालचाल न केल्याचा लाभ घेत युक्रेनच्या मल्लाने ग्राऊंड पोझिशनवरून आणखी चार गुण मिळवित भनवालावर 10-4 अशी भक्कम आघाडी घेतली. भनवालाने नंतर त्याला खाली घेत दोन गुण मिळविले आणि लढत संपण्यास 35 सेकंद असताना त्याने दिमीत्रोला मागे ढकलत चार गुण घेत बरोबरी साधली. 10-10 अशा गुणांवर लढत संपली असली तरी शेवटचा गुण भनवालाने मिळविला असल्याने त्याला या निकषानुसार विजयी घोषित करण्यात आले.
भनवालाने पहिल्या फेरीत लिथुआनियाच्या आईसटिस लिऑगमिनासवर 3-0 अशी मात केल्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत मोल्डोव्हाच्या अलेक्झांड्रिन गुटूकडून त्याला पराभव स्वीकारावा लागला. गुटूने अंतिम फेरी गाठल्यामुळे भनवालाला रेपेचेग फेरीत खेळण्याची संधी मिळाली. त्याचा लाभ घेत त्याने कझाकच्या रसूल झुनिसवर 9-6 अशा गुणांनी मात करून कांस्यपदकाच्या फेरीत स्थान मिळविले होते.
72 किलो वजन गटात भारताचा विकास उपांत्य फेरीत क्रोएशियाच्या पॅव्हेल पुल्कावेककडून पराभूत झाला. त्यालाही रेपेचेग लढतीत खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या लढतीत विजय मिळवित कांस्यपदकाच्या फेरीत स्थान मिळविले. जपानचा कोबायाशी व जॉर्जियाचा थिओडोरोस सोटिरियाडिस यापैकी एकाशी त्याची पदकाची लढत होईल. 60 किलो वजन गटात सुमितनेही रेपेचेग फेरीत स्थान मिळविले असून कझाकच्या ओल्झास सुलतानविरुद्ध त्याची लढत होईल. 67 किलो विभागात आशूला पात्रता फेरीतच जॉर्जियाच्या दिएगो चखिकव्हाझकडून तांत्रिक सरसतेवर पराभव स्वीकारावा लागला
भारताचे सहा ग्रीको रोमन मल्ल या स्पर्धेत दोन महिला व एक फ्रीस्टाईल मल्लांसह खेळत आहेत तर 21 मल्लांना स्पेन एम्बसीने व्हिसा नाकारल्याने ते जाऊ शकले नाहीत.