वृत्तसंस्था /अलमाटी, कझाखस्तान
भारताची 15 वर्षीय महिला आंतरराष्ट्रीय मास्टर बी. सविता श्री हिने येथे झालेल्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले.
तिला या स्पर्धेत 36 वे मानांकन मिळाले होते. 11 फेऱयांत तिने 8 गुण घेत तिसरे स्थान मिळविले. आठ फेऱया झाल्यानंतर ती 6.5 गुणांवर होती. नंतरच्या फेऱयांत तिने 1.5 गुण घेत तिसऱया स्थानावर झेप घेतली. या स्पर्धेत अनेक स्टार बुद्धिबळपटूंचा सहभाग होता. नवव्या फेरीत तिला कझाखच्या झन्साया अब्दुमलिककडून पराभव पत्करावा लागला, याचा तिला फटका बसल्याने पहिल्या दोनमध्ये तिला स्थान मिळविता आले नाही. दहाव्या फेरीत तिने सिंगापूरच्या कियानयुन गाँगवर शानदार विजय मिळविला व शेवटच्या फेरीत कझाखच्या दिनारा सदुआकॅसोव्हाला बरोबरीत रोखत ती पदक मिळविण्यात यशस्वी ठरली.
भारताची अव्वल खेळाडू व आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पटकावलेल्या कोनेरू हंपीला येथे सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. सविता, हंपी व अन्य दोघींनी सहावे स्थान मिळविले असले तरी सरस टायब्रेक गुणांकाच्या आधारे सरिताला कांस्यपदक मिळाले.