वृत्तसंस्था/ बुडापेस्ट (हंगेरी)
येथे सुरु असलेल्या बुडापेस्ट मानांकन 2023 च्या कुस्ती स्पर्धेत भारताची महिला मल्ल तसेच दोन वेळेला विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेतील पदक विजेती संगीता फोगटने 59 किलो वजन गटात कांस्यपदक मिळविले.
भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात असलेली महिला मल्ल संगीता फोगटने कांस्यपदकासाठीच्या लढतीत हंगेरीच्या व्हिक्टोरिया बोरसोसचा 6 – 2 अशा गुण फरकाने पराभव केला. संगीता फोगटने या वजन गटातील पहिल्या फेरीत अमेरिकेच्या जेनीफर रॉजर्सचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले होते. भारताच्या संगीता मोर, सुनीलकुमार, सुजित यांनी या स्पर्धेतून यापूर्वीच माघार घेतली आहे. झाग्रेब येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत भारताने 2 कांस्यपदके मिळविली होती. दरम्यान बुडापेस्टमध्ये सुरु झालेल्या कुस्ती स्पर्धेतून विनेश फोगटने प्रकृती नादुरुस्तीमुळे माघार घेतली आहे.