वेटलिफ्टर गुरुराजा पुजारीने पुरुषांच्या 61 किलोग्रॅम वजनगटात कांस्यपदकाची कमाई केली. यापूर्वी 2018 गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य जिंकणाऱया गुरुराजाने येथे एकूण 269 किलोग्रॅम (118 व 151 किलोग्रॅम) वजन उचलले. या इव्हेंटमध्ये मलेशियाच्या अझनिल बिन बिदिन मोहम्मदने 285 किलोग्रॅम वजन (127 व 158 किलो) उचलत सुवर्ण तर पीएनजीच्या मोरिआ बारुने 273 किलोग्रॅम (121 व 152) वजन उचलत रौप्यपदकाची कमाई केली. भारताचे हे स्पर्धेतील दुसरे पदक ठरले.
कुशाग्रा रावत 200 मीटर्स फ्री स्टाईलमध्ये अपयशी
भारतीय जलतरणपटू कुशाग्रा रावत 200 मीटर्स फ्री स्टाईल इव्हेंटमध्ये पुढील फेरीसाठी पात्रता मिळवू शकला नाही. 8 स्पर्धकांच्या हिटमध्ये त्याला 1 मिनिट 54.56 सेकंद वेळेसह शेवटच्या स्थानी समाधान मानावे लागले.
श्रीहरी नटराजची अंतिम फेरीत धडक
भारताचा आघाडीचा जलतरणपटू श्रीहरी नटराजने पुरुषांच्या 100 मीटर्स बॅकस्ट्रोक इव्हेंटमध्ये अंतिम फेरीत धडक मारली. त्याने 54.55 सेकंद वेळेत ही शर्यत पूर्ण करत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. आता निर्णायक अंतिम फेरीत पीटर कोएत्झे (द. आफ्रिका), ब्रॉडी पॉल विल्यम्स (इंग्लंड), ऍन्डय़्रू जेफकोट (न्यूझीलंड), ब्रॅडली वूडवर्ड (ऑस्ट्रेलिया) यांच्याशी त्याची झुंज रंगू शकते.
दरम्यान, भारताचा पॅरा-स्विमर आशिष कुमार सिंगला पुरुषांच्या 100 मीटर्स बॅकस्ट्रोक एस9 फायनल्समध्ये आठव्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याने अंतिम फेरीत 1 मिनिट 18.21 सेकंद अशी वेळ नोंदवली. या गटात ऑस्ट्रेलियाच्या इलिजाह विनिंग्टन, दक्षिण आफ्रिकेचा मॅथ्यू सेट्स यांनी तिसऱया हिटमध्ये आघाडी मिळवली. साजन प्रकाशला पुरुषांच्या 50 मीटर्स बटरफ्लाय इव्हेंटमध्ये 25.01 सेकंद वेळेसह आठव्या स्थानी तर पुरुषांच्या 400 मीटर्स फ्री स्टाईल हिट्समध्ये रावतला 14 व्या स्थानी समाधानी मानावे लागले.
सायकलस्वार मयुरी, त्रिशा पॉलचे आव्हान संपुष्टात
महिलांच्या स्प्रिन्ट क्वॉलिफाईंगमध्ये भारतीय सायकलपटूंनी निराशा केली. मयुरी लुटे व त्रिशा पॉल यांना अनुक्रमे 20 व 23 व्या स्थानी समाधान मानावे लागल्यानंतर स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. पुरुषांच्या 400 मीटर्स परस्यूट गटात विश्वजीत सिंग, नमन कपिल, वेंकाप्पा केंगलगुट्टी, अनंता नारायण व दिनेश कुमार यांनी सहावे स्थान मिळवले. स्प्रिन्ट इव्हेंटमध्ये देखील भारतीय संघाला सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. या इव्हेंटमध्ये ऑस्ट्रेलिया व इंग्लंडचे संघ सुवर्णपदकाच्या लढतीत पोहोचले असून न्यूझीलंड-कॅनडा यांच्यात कांस्यपदकासाठी लढत होणार आहे.
भारतीय टेटे संघाची उत्तर आयर्लंडवर एकतर्फी मात
शरथ कमलच्या नेतृत्वाखालील भारतीय टेटे संघाने उत्तर आयर्लंडवर 3-0 अशा एकतर्फी फरकाने मात दिली. शरथ कमल व हरमीत देसाई यांनी जेम्स स्केल्टॉन-ओव्हन कॅचर्ट यांच्यावर 11-3, 9-11, 11-6, 11-1 अशा फरकाने मात देत विजयी सलामी नोंदवली. त्यानंतर सनिल शेट्टीने पॉल मॅक्रेचा 11-5, 15-13, 11-6 असा धुव्वा उडवत संघाची आघाडी भक्कम केली. हरमीत देसाईने कॅचर्टला 5-11, 11-11-9, 12-14, 11-3, 11-6 अशा फरकाने हरवल्यानंतर भारताच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब झाले.
त्यापूर्वी, सकाळच्या सत्रात भारतीय टेटे संघाने सिंगापूरचा देखील 3-0 असा धुव्वा उडवला होता. हरमीत देसाई व साथियन यांनी शाओ फेंग-क्लॅरेन्स झे यू यांचा 11-5, 11-5 असा सहज फडशा पाडला तर अनुभवी शरथ कमलने अनुभवाच्या बळावर पँग यू इन कोएनला नमवण्यासाठी फारसा वेळ घेतला नाही. त्याने 11-8, 11-9, 11-9 असा विजय मिळवला. त्यानंतर साथियनने क्लॅरेन्सचा पराभव केला.
भारतीय मिडफिल्डर नवज्योत कौरला कोरोनाची बाधा
भारतीय हॉकी संघातील मिडफिल्डर नवज्योत कौरला कोरोनाची बाधा झाली असून यामुळे तिला मायदेशी परतावे लागले. मूळ कुरुक्षेत्र येथील 27 वर्षीय नवज्योत कौर मागील दोन दिवसांपासून आयसोलेशनमध्ये होती. आता तिच्या जागी सोनिकाचा 18 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. भारताने यंदा आपल्या राष्ट्रकुल मोहिमेला घानाविरुद्ध 5-0 अशा एकतर्फी विजयाने उत्तम सुरुवात केली आहे.
मिश्र दुहेरी बॅडमिंटनमध्ये भारत बाद फेरीत
भारतीय बॅडमिंटनपटूंनी दुसऱया गटातील अ सामन्यात दुबळय़ा श्रीलंकेचा 3-0 असा एकतर्फी फडशा पाडत मिश्र दुहेरीच्या बाद फेरीतील स्थान निश्चित केले. पहिल्या दिवशी पाकिस्तानचा 5-0 असा एकतर्फी पराभव केल्यानंतर तोच धडाका भारताने लंकेविरुद्ध कायम राखला.
अश्विनी पोनप्पा व सात्विकसाईराज रणकिरेड्डी यांनी सचिन दियास व थिलिनी हेंदहेवा यांचा 21-14, 21-9 असा पराभव करत भारताला आघाडी मिळवून दिली. वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्य जेता लक्ष्य सेनने निलुका करुणारत्नेचा 21-18, 21-5 असा पराभव केला तर आकार्शी कश्यपने सुहास्नि विदनगेचा 21-3, 21-9 असा सहज पराभव केला.
सर्वात युवा ऍथलिट अनाहत सिंगची विजयी सलामी
भारताची सर्वात युवा ऍथलिट, 14 वर्षीय स्क्वॅशपटू अनाहत सिंगने महिला एकेरीत शनिवारी विजयी सलामी दिली. तिने सेंट व्हिन्सेंट अँड द ग्रेनाडिन्सच्या रॉस्सचा 11-5, 11-2, 11-0 असा पराभव करत आगेकूच केली.
‘वरिष्ठ गटातील ही पहिलीच स्पर्धा असल्याने किती अपेक्षा करावी, हा प्रश्नच आहे. पण, या माध्यमातून मला उत्तम अनुभव मिळेल, याची खात्री वाटते. माझ्या कुटुंबातील बरेच सदस्य इथे पोहोचले आहेत. ते ही माझ्या विजयाचे साक्षीदार ठरले’, असे ती म्हणाली. यंदा आशियाई ज्युनियर स्क्वॅश व जर्मन ओपन स्पर्धेत 15 वर्षाखालील वयोगटात धवल यश प्राप्त केल्यानंतर अनाहतला राष्ट्रकुल स्पर्धेसाठी संधी देण्यात आली.
फायनलसाठी पात्र ठरणारा योगेश्वर सिंग भारताचा एकमेव पुरुष जिम्नॅस्ट
योगेश्वर सिंग हा ऑल अराऊंड फायनलमध्ये पात्र ठरणारा भारताचा एकमेव पुरुष जिम्नॅस्ट ठरला. त्याचे संघसहकारी सैफ ताम्बोली व सत्यजीत मोंडल यांची संधी मात्र अगदी किंचीत फरकाने हुकली.
आजवर 3 वर्ल्ड चॅम्पियनिशपमध्ये भाग घेतलेल्या हरियाणाच्या 25 वर्षीय योगेश्वर सिंगने 73.600 असा स्कोअर केला. त्यापूर्वी फायनलसाठी पात्रता मिळवण्यासाठी त्याला थोडेफार झगडावे लागले. व्हॉल्ट व फ्लोअर इव्हेंट्समध्ये योगेश्वरची निराशा झाली. पण, नंतर त्याने बरीच सुधारणा घडवत अंतिम फेरीत धडक मारली. आता दि. 2 ऑगस्ट रोजी फायनलमध्ये तो पदक जिंकण्यासाठी प्रयत्न करेल.