ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ बीएसएफ जवानांनी पॅरा बॉम्बच्या सहाय्याने पाकिस्तानी ड्रोन पाडला. या ड्रोनला बांधण्यात आलेल्या एका पिशवीतून चार किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. बीएसएफच्या एका प्रवक्त्यानं यासंदर्भात माहिती दिली आहे.
पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एक संशयित ड्रोन घिरटय़ा घालत होता. पहाटे तीनच्या सुमारास बीएसएफ जवानांनी पॅरा बॉम्बच्या सहाय्याने हा ड्रोन पाडला. या ड्रोनला एक हिरव्या रंगाची पिशवी बांधण्यात आली होती. त्यामध्ये चार मोठी आणि एक काळ्या फॉईलने बांधलेलं छोटं पाकीट होतं. या पाकिटांमध्ये ड्रग्ज आढळून आले. पाकिटांसह ड्रग्जचे वजन 4.17 किलो आहे. ड्रोनचे मॉडेल डीजेआय मॅट्रिक्स 300 आरटीएक्स होते. याआधी 5 मार्चला पठाणकोटमध्ये भारत-पाक सीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या हालचाली पाहायला मिळाल्या होत्या.