होळीच्या दिवशी 113 भूखंडांचा ऑफलाईन लिलाव : भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बुडाच्या ऑफलाईन भूखंड लिलावासंबंधी आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या लिलावामुळे बुडाचे मोठे नुकसान होणार असून नागरिकांना अंधारात ठेवून होळीच्या दिवशी लिलाव करण्यात आला आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आपचे उत्तर कर्नाटक विभाग प्रमुख राजकुमार टोपण्णावर यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार केली आहे. मार्च 2022 मध्ये ऑनलाईन लिलावासाठी निविदा मागविण्यात आली होती. मात्र 18 मार्च रोजी होळीच्या दिवशी 113 भूखंडांचे ऑफलाईन लिलाव करण्यासाठी निविदा काढल्या.
या लिलावात 91 भूखंड विकले गेले आहेत. खरे तर यासंबंधी अधिक प्रसिद्धी केली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना आणि भूखंड घेवू इच्छिणाऱयांना लिलावाची माहितीच नव्हती. जर मार्च महिन्यातच ऑनलाईन लिलाव केला असताना याचवेळी ऑफलाईन लिलावाचे आयोजन का केले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
18 मार्च रोजी झालेल्या भूखंडांच्या लिलावासंबंधी माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. त्या दिवशी होळी होती. बहुतेक लोक सण साजरा करीत होते. होळीच्या दिवशी जागेची खरेदी करीत नाहीत. सुटी असल्यामुळे लोक सण साजरा करण्यात गुंतले होते. अशावेळेत अत्यंत कमी किमतीत भूखंडांचा लिलाव करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा संशय असून अधिकारी भ्रष्टाचारात बुडाले आहेत.