अटकेच्या कारवाईचा तीव्र निषेध : शेकडोंचा सहभाग
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली भाजप नेते तजिंदर बग्गा यांच्या अटकेवरून दुसऱया दिवशी शनिवारीही गोंधळ सुरूच राहिला. स्वगृही परतल्यानंतर बग्गा यांनी अरविंद केजरीवाल यांना आव्हान दिले आहे. आपल्याविरुद्ध 1 नव्हे तर 100 एफआयआर दाखल केले तरीही आपण घाबरणार नसल्याचे सांगत कायदेशीर लढाई लढण्याची पूर्ण तयारी असल्याचे बग्गा यांनी स्पष्ट केले. याचदरम्यान बग्गा यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी केजरीवाल यांच्या निवासावर धडक मोर्चा काढत दिल्ली सरकारवर दबावाचा प्रयत्न केला. भाजपचे शेकडो कार्यकर्तेही त्यांच्यासोबत होते. या धडक आंदोलनामुळे येथे मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याचवेळी बग्गा याच्या अटकेनंतर पंजाब पोलिसांनी दिल्ली आणि हरियाणा उच्च न्यायालयात अटकेबाबतची सुनावणी पुढे ढकलली आहे. आता मंगळवारी सुनावणी होणार आहे.
दिल्ली भाजपचे नेते आणि प्रवक्ते तजिंदर बग्गा यांना शुक्रवारी पंजाब पोलिसांनी दिल्लीतून अटक केल्यामुळे वेगवेगळय़ा पोलीस आणि प्रशासनांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. बग्गा यांना पंजाब पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. त्यानंतर त्यांना हरियाणा पोलिसांनी ताब्यात घेत दिल्ली पोलिसांच्या हवाली केले. दिवसभर वेगाने घडत गेलेल्या या कारवाईचा निषेध करत भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. बग्गा यांच्यावर ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरुद्ध मोहाली सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटकेच्या या कारवाईनंतर अरविंद केजरीवाल सरकारवर भाजपने टीकेची झोड उठवली आहे. श्री गुरु ग्रंथ साहिबची बदनामी करणाऱयांना 24 तासांत तुरुंगात टाकण्याचा इशारा अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी दिला होता. मात्र, आजपर्यंत हे का शक्य झाले नाही? असा प्रश्न बग्गा यांनी उपस्थित केला. तसेच आता आपण कारवाईविरोधात कायदेशीरपणे लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकमेकांविरोधात न्यायालयीन लढा
पंजाब सरकारने याप्रकरणी हायकोर्टात दोन अर्ज दिले आहेत. पहिल्या अर्जात या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये बग्गा याच्या अटकेने पिपली पोलीस स्टेशन आणि कुरुक्षेत्र हायवेच्या सीसीटीव्ही फुटेजचा मुद्दा उपस्थित झाला आहे. दुसऱया अर्जात भाजप नेते तजिंदर बग्गा आणि दिल्ली पोलिसांना पक्षकार म्हणून सहभागी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारीच दिल्ली पोलिसांच्यावतीने वकील सत्यपाल जैन हजर झाले आहेत. पंजाब सरकारने सुरुवातीला हरियाणा पोलिसांविरोधात याचिका दाखल केली होती. तजिंदर बग्गा यांनीही मोहाली सायबर क्राईम सेलमध्ये दाखल झालेल्या गुन्हय़ाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणीही मंगळवारी होणार आहे. या प्रकरणात बग्गा यांना अद्याप कोणताही अंतरिम दिलासा मिळालेला नाही.