येळ्ळूर येथील जागा कब्ज्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रा.पं.ला पाठविली नोटीस
प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर येथील गायरान जमिनीमध्ये क्रीडा व युवा सबलीकरण विभागाच्यावतीने क्रीडांगण उभे करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्याला ग्राम पंचायत व येळ्ळूर ग्रामस्थांनी विरोध केला असतानाही त्या ठिकाणी क्रीडांगण उभे करण्यासाठी जागा कब्ज्यात घ्यावी, अशी नोटीस जिल्हाधिकारी नितेश पाटील ग्राम पंचायतीला दिली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
येळ्ळूर येथील ग्रा. पं. च्या अखत्यारीमध्ये मोजकीच गायरान जमीन शिल्लक आहे. सर्व्हे क्रमांक 1142 मध्ये असलेली 66 एकर 17 गुंठेमधील 40 एकर जमीन क्रीडांगणासाठी कब्ज्यात घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटीस देण्यात आली आहे.
यामुळे येळ्ळूर गावाला जमिनीच शिल्लक राहणार नाहीत. यासाठी विविध विभागाची सात जणांची समितीदेखील नेमली आहे. दरम्यान, या सर्व्हे क्रमांकमध्ये काही घरेही बांधण्यात आली आहेत. ती घरेही हटविण्याबाबत या नोटिसीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. गायरान जमीन देता येत नाही तरी या क्रीडांगणासाठी आमचा विरोध आहे म्हणून ग्राम पंचायतमध्ये सर्व सदस्यांनी एकजुटीने त्याविरोधात ठराव केला होता. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते. असे असताना अशा प्रकारे क्रीडांगणासाठी जमीन कब्जा घेण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे.
त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्या विरोधात पुन्हा लढा देण्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.