उत्तरप्रदेश पोलिसांची कारवाई ः उमेश पाल हत्याप्रकरण
वृत्तसंस्था/ प्रयागराज
उत्तरप्रदेश सरकारने उमेश पाल यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. माफिका अतीक अहमदचा हस्तक जफर अहमदचे घर बुलडोझरने बुधवारी जमीनदोस्त करण्यात आले आहे. तर कारवाईपूर्वी पोलिसांनी घरातून तलवार, पिस्तुल आणि एक रायफल हस्तगत केली आहे.
पाडविण्यात आलेल्या घराची किंमत 3 कोटी रुपये होती असे सांगण्यात येत आहे. अतीक अहमदचे घर यापूर्वीच जप्त करण्यात आले होते. तर जफरने माफियाच्या कुटुंबाला आश्रय दिला होता. जफर हा माफिया अतीक अहमदच्या गुन्हेगारी टोळीतच कार्यरत होता. उमेश पाल यांनी काही दिवसांपूर्वी जफर विरोधात गुन्हा नेंदविला होता.
उमेश पाल यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत माफियाला मातीत गाडून टाकू अशी घोषणा केली होती. यानंतरच पोलीस आणि प्रशासन ऍक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. एका आरोपीचा चकमकीत मृत्यू झाला आहे. तर सदाकत नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या कारचा मालक नफीसलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
उमेश पाल यांची 24 फेब्रुवारी रोजी धूमनगंजमध्ये हत्या झाली होती. त्यांच्या हत्येत 13 शूटर्स सामील होते. यातील 6 जणांनी गोळय़ा झाडल्या होत्या. हत्येच्या कटाचा सूत्रधार हा अहमदाबाद येथील तुरुंगात कैद अती अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ हा होता. अशरफ हा बरेली येथील तुरुंगात कैद आहे. तुरुंगातूनच दोघांनी व्हॉट्सऍपद्वारे स्वतःच्या गुंडांना हत्येचा निर्देश दिला होता.
उत्तरप्रदेशात जीवाला धोका
गुजरातच्या तुरुंगात कैद असलेल्या अतीक अहमदने उत्तरप्रदेशात जीवाला धोका असल्याचे सांगत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उमेश पाल हत्याप्रकरणी अटक करत उत्तरप्रदेशात पाठविले जाऊ नये अशी मागणी त्याने केली आहे. याप्रकरणी गुजरातमध्येच चौकशी व्हावी, उत्तरप्रदेशात माझ्या जीवाला धोका असल्याचा दावा अतीक अहमदने केला आहे.