हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथे एका पित्याने आपल्या जावयाला हुंडा म्हणान कार किंवा बाईक देण्याची प्रथा मोडून चक्क बुलडोझर दिल्याची घटना प्रकाशात आली आहे. असा अनोखा हुंडा देण्यामागचे या पित्याचे तर्कशास्त्रही वाखाणण्याजोगे आहे. कार दिली असती तर ती केवळ चैनीसाठी चालविली गेली असती. त्यातून जावयाला किंवा मुलीच्या कुटुंबाला कोणताही आर्थिक लाभ झाला नसता. उलट त्यांचा खर्च वाढला असता. पण बुलडोझर दिल्याने तो भाडय़ाने देऊन किंवा स्वतः चालवून बऱयापैकी पैसा मिळेल अशी त्याची अटकळ आहे.
या कल्पक पित्याचे नाव स्वामीदिन चक्रवर्ती असे असून ते माजी सैनिक आहेत. त्यांचे पुत्र विकास तथा योगेंद्र असून ते भारतीय वायुदलात आहेत. 15 डिसेंबरला त्यांचा विवाह पार पडला. वधू सैन्यदलातीलच परसराम प्रजापती यांची कन्या आहे. यावेळी वधूच्या पित्याने जावयाला हुंडा म्हणून बुलडोझर दिला. वराच्या पित्याला ही बाब आधीपासूनच माहित होती. वराच्या कुटुंबाची या हुंडय़ाला सहमती होती. पण इतर विवाह समारंभासाठी आलेल्या इतर नातेवाईकांना या हुंडय़ाचे अप्रूप वाटल्याशिवाय राहिले नाही. हा पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला होता. अनेक नातेवाईक मोठय़ा कौतुकाने या बुलडोझरसह सेल्फी काढत होते.
जावईही भारतीय वायुदलात असल्याने ते फारसे घरात असत नाहीत. त्यामुळे हुंडा म्हणून कार दिली असती तर ती घरासमोरच उभी ठेवावी लागली असती. आता बुलडोझर दिल्याने त्याचा पैसे मिळविण्यासाठी उपयोग होणार आहे. वधू सध्या नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. तिला नागरी सेवेत नोकरी हवी आहे.