दिल्ली महापालिकेने पोलिसांकडून मागवला अतिरिक्त फौजफाटा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जहांगीरपुरीमध्ये बुलडोझर चालवल्यानंतर आता दक्षिण दिल्ली महापालिकेनेही बुलडोझर मोहीम राबवण्याची तयारी केली आहे. अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेसाठी दक्षिण महानगरपालिकेने दिल्ली पोलिसांकडून अतिरिक्त फौजफाटाही मागवला आहे. 9 मे ते 13 मे या कालावधीत दक्षिण महानगरपालिका शाहीन बाग, कालिंदी कुंज, जसोला, एमजी रोड, करणी सिंग शूटिंग रेंज परिसरातील अतिक्रमण हटवले जाणार आहे. ही केवळ अतिक्रमणविरोधी मोहीम असून बेकायदा बांधकामे पाडली जाणार असल्याचे दक्षिण एमसीडीचे महापौर मुकेश सूर्यन यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेने 30 एप्रिलपासून अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली असून ती 4 ते 6 मेपर्यंत सुरू राहणार आहे. याशिवाय 9 ते 13 मे दरम्यान दुसऱया टप्प्यात अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. बुधवारी सकाळी तुघलकाबादच्या शूटिंग रेंजमधील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.