मोहम्मद शमीचा राखीव खेळाडूत समावेश, रविंद्र जडेजा तंदुरुस्त नसल्याने संघातून बाहेर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दुखापतीवर मात करुन पूर्ण तंदुरुस्त झालेला जलद गोलंदाज जसप्रित बुमराह व डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट हर्षल पटेल यांचे आगामी आयसीसी टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन झाले आहे. अनुभवी स्पीडस्टार मोहम्मद शमी राखीव खेळाडूत समाविष्ट आहे तर रविंद्र जडेजा अलीकडेच शस्त्रक्रिया झाली असल्याने या महत्त्वाच्या स्पर्धेत खेळू शकणार नाही. यंदाची आयसीसी टी-20 वर्ल्डकप दि. 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात खेळवली जाईल. भारतीय संघाच्या मोहिमेचा प्रारंभ दि. 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध लढतीने होईल.
बुमराह यापूर्वी पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता तर हर्षल कमरेच्या दुखापतीमुळे खेळू शकत नव्हता. या दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅबिलेशन प्रोगॅम यशस्वीरित्या पूर्ण केला आणि त्यानंतर बीसीसीआय वैद्यकीय पथकाने त्यांना वर्ल्डकपसाठी फिट जाहीर केले.
जलद गोलंदाज अवेश खान व लेगस्पिनर रवि बिश्नोई यांना या संघातून वगळले गेले असून वरिष्ठ ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला मात्र स्थान देण्यात आले. अनुभवी स्पीडस्टार मोहम्मद शमीचा पुन्हा एकदा टी-20 क्रिकेट प्रकारात विचार केला गेला असून चार राखीव खेळाडूंसह तो दौऱयावर समाविष्ट असेल. श्रेयस अय्यर, बिश्नोई व सीमर दीपक चहर हे अन्य 3 राखीव खेळाडू आहेत.
ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका सुरु असताना हार्दिक पंडय़ा, अर्शदीप सिंग व भुवनेश्वर कुमार कंडिशनिंग रिलेटेड वर्कसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत असतील. भुवनेश्वर कुमार दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत तर हार्दिक पंडय़ा व अर्शदीप ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत खेळणार नाही. मालिकेला दि. 20 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.
भारताचा टी-20 वर्ल्डकप संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, आर. अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू ः मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, दीपक चहर.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, आर. अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रित बुमराह.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर. अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रित बुमराह.