चिमुकल्यांच्या अध्ययनावर परिणाम, सेविकांवर ताण
बेळगाव : अंगणवाडी सेविकांना समीक्षा सर्व्हेचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे अंगणवाडीच्या इतर कामांवर परिणाम होऊ लागला आहे. महिला व बालकल्याण खात्याने अंगणवाडी सेविकांवर सर्व्हेचा बोजा लादला आहे. त्यामुळे चिमुकल्यांच्या अध्ययनावर परिणाम होत आहे. त्यामुळे खात्याने या कामासाठी स्वतंत्र लोकांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे. अंगणवाडी सेविकांवर अध्ययन, पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजनाच्या नोंदी, लसीकरण यासह दैनंदिन कामाचा ताण असतो. शिवाय अलिकडे ऑनलाईन नोंदी ठेवाव्या लागत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे काम वाढले आहे. त्यातच आता महिला व बालकल्याण खात्याने समीक्षा सर्व्हेचे काम अंगणवाडी सेविकांच्या हातात दिले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांवर कामाचा बोजा वाढला आहे. जिल्ह्यात 5 हजार 331 अंगणवाड्या आहेत. या सर्व अंगणवाडीतील सेविकांना समीक्षा सर्व्हेसाठी जुंपण्यात आले आहे. मागील दोन दिवसांपासून समीक्षा सर्व्हेचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे अंगणवाडीतील इतर कामांवर या सर्व्हेचा परिणाम होऊ लागला आहे. सेविकांना घरोघरी जाऊन सर्व माहिती घ्यावी लागत आहे. त्यामुळे वेळही खर्ची होत आहे. काही अंगणवाड्यांमध्ये केवळ सेविका आहेत. मदतनीस नाहीत अशा अंगणवाडी सेविकांसमोर अडचणी येऊ लागल्या आहेत. जिल्ह्यातील 1300 हून अधिक अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत भरल्या जातात तर काही अंगणवाड्यांमध्ये मदतनीस नाहीत. केवळ अंगणवाडी सेविकांवरच कारभार सुरू आहे. दरम्यान सेविकांना आता समीक्षा सर्व्हेचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे दैनंदिन अंगणवाडीच्या कामात अडचणी येऊ लागल्या आहेत.