चार कपाटे फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास
सावंतवाडी/प्रतिनिधी-
सावंतवाडी शहरातील वैश्यवाडा जुम्मा मशिद परिसरात आज आणखी एक घरफोडीचा प्रकार उघड झाला आहे.यात संबंधित चोरट्यांनी चार कपाटे फोडून गणपतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविले आहेत. दीक्षाआकेरकर असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ही चोरी केली आहे. हा प्रकार काल झाला असावा, असा संशय आहे. शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती आकेरकर यांना दिली. त्यांनी माहिती दिल्यानंतर घरमालकांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आकेरकर काही दिवसापूर्वी मुंबईतील मुलीच्या घरी राहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र काल झालेल्या चोरीच्या प्रकारानंतर वैश्यवाडा परिसरात असलेल्या त्यांच्या घराची कडी तुटलेल्या अवस्थेत दिसली. हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती आकेरकर याना दूरध्वनीच्या माध्यमातून दिली. त्यानंतर त्या आज सावंतवाडीत दाखल झाल्या. त्यांनी या ठिकाणी नेऊन घराची पाहणी केली असता तर घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. तसेच कपाटात ठेवण्यात आलेले काही रोख रक्कम व गणपतीच्या मूर्तीला घालण्यात येणाऱ्या सोन्या-चांदीचे दागिने नसल्याचे त्यांना दिसून आले. याबाबत त्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.